मंत्री नरहरी झिरवाळांच्या हकालपट्टीची काँग्रेसची आक्रमक मागणी

मुंबई – राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या धक्कादायक घटनांची मालिका सुरू असून, महायुती सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने पसरत आहे. या गंभीर प्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारने याची त्वरित दखल घेऊन नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचे मोठे उदाहरण असल्याचे स्पष्ट केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही निशाणा साधला. या कथित बाबाच्या अनैतिक दरबारात महायुती सरकारच्या तब्बल डझनभर मंत्र्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याने राज्याची आधीच मोठी नाचक्की झाली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे घनिष्ठ संबंध असणे ही अत्यंत लांछनास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला असला, तरी त्यांच्याकडे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा हे पद कायम आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाळगलेले मौन संशयास्पद असून, त्यांनी चाकणकर व झिरवाळ या दोघांनाही सर्व पदांवरून त्वरित मुक्त करावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वारसा चालवत असल्याचे विधान नुकतेच केले होते. यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सपकाळ यांनी हे वक्तव्य पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा मार्ग एकदम भिन्न असल्याने सुप्रिया सुळे यांनी आपले विधान मागे घ्यावे, असे त्यांनी सुनावले.
दुसरीकडे, अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यापासून पक्षात मोठ्या प्रमाणावर कुरघोड्यांचे राजकारण पाहायला मिळत आहे. नरहरी झिरवाळ यांच्यासोबत व्हिडिओत दिसणारी तृतीयपंथी व्यक्ती ही पक्षातीलच एका अत्यंत ज्येष्ठ नेत्याच्या जवळची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चर्चा झाल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो, हे टाळण्यासाठी सध्या पक्षात जोरदार रणनीती तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याच मुद्द्यावरून नागपूर येथे बोलताना काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्य सरकारला धारेवर धरले. अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांकडून होणारा शासकीय निवासस्थानाचा गैरवापर यावर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. यापूर्वी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) ट्रॅप लागूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती आणि आता त्यांनी थेट शासकीय बंगल्याचा गैरवापर केला आहे. काही लोक आपली खुर्ची टिकवण्यासाठी तर काहींना पदावरून हटवण्यासाठी तंत्र-मंत्राचा आधार घेत आहेत, जे संविधानाची शपथ घेतलेल्यांना अजिबात शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली. पुणे जमीन घोटाळा असो किंवा आरटीओमधील वसुली प्रकरण, सरकार नेहमी छोट्या माशांवर कारवाई करून मोठ्या धेंडांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारच्या आत सुरू असलेल्या या अंतर्गत गँगवारमुळे संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी शेवटी स्पष्ट केले.




