नाशिक कुंभमेळ्यात हिंदू व्यतिरिक्त कुणीही व्यवसाय केल्यास खपवून घेणार नाही; मंत्री नितेश राणे

मुंबई – नाशिक येथे हिंदू हित रक्षा या संघटनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक आणि कामगारांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. या कुंभमेळ्यात केवळ हिंदू बांधवांनाच स्टॉल लावता येतील, जर अन्य कुणी व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि त्यांचे स्टॉल मुळासकट हटवले जातील, असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच, ‘आम्ही राज्याच्या मंत्रालयात बसलो आहोत, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही’, असा विश्वासही त्यांनी हिंदू समाजाला दिला.
नितेश राणे यांनी यावेळी ‘हिंदूंनी केवळ हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी’ या विचाराचे जोरदार समर्थन केले. आपण खारघर येथेही हीच भूमिका मांडली होती, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या विशिष्ट कट्टर प्रवृत्तीच्या लोकांच्या दुकानांबद्दल बोलल्याने माध्यमांनी आपल्यावर प्रचंड टीका केली होती, मात्र आपल्याला त्या गोष्टीचा कोणताही फरक पडत नाही, असे ते म्हणाले. ‘हिंदू राष्ट्रात राहून हिंदूंच्या हिताबद्दल का बोलू नये? मग काय पाकिस्तान किंवा इस्लामाबाद बद्दल बोलायचे का?’ असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्याचे उदाहरण देत, त्यांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर एक तरी हिंदू कामगार शोधून दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्या धार्मिक ग्रंथानुसार ते इतरांकडून काहीही घेत नाहीत, मग आम्ही आमच्या लोकांसाठी असा विचार केल्यास त्यात गैर काय, असे नितेश राणे म्हणाले. आपण दोन वेळा त्यांचा धार्मिक ग्रंथ वाचला असून, त्यात आपल्या उत्पन्नाचा १० टक्के हिस्सा जकात म्हणून देण्यास सांगितले आहे आणि तोच पैसा विशिष्ट कट्टरवादी कामांसाठी वापरला जातो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी काही कट्टर गट २०४७ पर्यंत या देशाला एका विशिष्ट धर्माचे राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत. आपला पैसा जर कथित लव्ह जिहाद सारख्या कामांसाठी वापरला जात असेल, तर नागरिकांनी त्यांच्याकडून खरेदी करण्यापूर्वी नक्कीच विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी कुंभमेळा २०२७ ची तयारी सध्या जोरात सुरू असून, या पवित्र ठिकाणी कोणत्याही कट्टर मानसिकतेच्या व्यक्तीला प्रवेश मिळता कामा नये, त्याला इथे येण्याची भीती वाटली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पूर्वी त्र्यंबकेश्वर मध्ये एका दुकानाला भेट दिली असता दुकानाचे नाव वेगळे होते मात्र आत अब्दुल नावाचा व्यक्ती बसल्याचे निदर्शनास आले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. आता देशभरात हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, या संकल्पनेचा प्रसार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात आपण एक आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून सहभागी झालो आहोत, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
येथील महापौर आणि नगरसेवक आपलेच असल्यामुळे नाशिक मध्ये केवळ जय श्रीराम चा जयघोष ऐकू येईल, इथे आय लव्ह मोहम्मद सारख्या घोषणा चालणार नाहीत, असे सांगत त्यांनी स्थानिक प्रशासनावर आपलेच वर्चस्व असल्याचे अधोरेखित केले. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून देशातील सर्वात कठोर कायदा आपल्याच राज्यात असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हे सरकार हिंदू समाजाने निवडून दिले असून, आम्ही विशिष्ट वस्त्यांमध्ये जाऊन मते मागितलेली नाहीत, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.





