सोलापूर

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत सोलापूर शहरासाठी ५० हजार व ग्रामीणसाठी ३ लाख धान्य इष्टांक वाढवावा; खासदार प्रणिती शिंदे यांची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

 

सोलापूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन सोलापूर शहर व ग्रामीण भागासाठी वाढीव इष्टांक मंजूर करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णय क्र. असुका-२०२५/प्र.क्र.१६/नापु-२८ दि. १ एप्रिल २०२५ अन्वये सोलापूर शहरासाठी प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अंतर्गत ५,१५,९९४ तर सोलापूर ग्रामीणसाठी १६,२५,२३४ इतका इष्टांक निश्चित करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून देण्यात आलेला हा इष्टांक अत्यंत कमी असल्याने मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी रेशनकार्डधारकांकडून सातत्याने मिळत असल्याचे खासदारांनी नमूद केले आहे.
सद्यस्थितीत सोलापूर शहरात इष्टांक शून्य असल्याचे दिसून येत असून सोलापूर ग्रामीणमधील ११ तालुक्यांमध्ये केवळ १७,६०८ इतकाच इष्टांक शिल्लक आहे. त्यामुळे अनेक पात्र कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ मिळू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासाठी ५०,००० (अक्षरी : पन्नास हजार) आणि सोलापूर ग्रामीणसाठी ३,००,००० (अक्षरी : तीन लाख) इतका वाढीव इष्टांक तातडीने मंजूर करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सोलापूर शहर व ग्रामीण भागातील संबंधित माहितीही निवेदनासोबत शासनाकडे सादर करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button