लाडक्या बहिणींच्या योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात

तब्बल १.०५ कोटी महिला अपात्र, तर गॅस टंचाईवरूनही दिला आंदोलनाचा इशारा
मुंबई – सध्या विधिमंडळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री एकीकडे भाषणांची खैरात करत असताना, दुसरीकडे सरकारने लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.०५ कोटी महिलांना अपात्र ठरवले असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
या योजनेची सविस्तर आकडेवारी मांडताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जेव्हा ही योजना सुरू झाली, तेव्हा सुरुवातीला तब्बल २.५३ कोटी लाभार्थी महिला होत्या. त्यावेळी या योजनेसाठी ४५,००० कोटी रुपये इतके भक्कम बजेट होते. मात्र, आता छाननी आणि तपासणीनंतर संभाव्य पात्र महिलांची संख्या केवळ १ कोटी ४८ लाख ६० हजार इतकीच राहिली आहे. परिणामी, आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेची तरतूद घटवून ती २६,५०० कोटी रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास १.०५ कोटी महिलांना यातून वगळण्यात आले आहे. निवडणुकांच्या काळात मते मिळवण्यासाठी शासनाने सरसकट सर्व बहिणींना पैसे वाटले, मात्र आता निवडणुका जिंकल्यावर हळूहळू त्यांचे ‘लाडक्या बहिणींवरील’ प्रेम कमी होऊ लागले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
या राजकीय मुद्द्याव्यतिरिक्त, रोहिणी खडसे यांनी वाढत्या गॅस टंचाईच्या गंभीर समस्येकडेही सरकारचे लक्ष वेधले आहे. सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका भारतातील सर्वसामान्यांना बसत आहे. यामुळे राज्यात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल्स आणि खानावळी गॅसअभावी हळूहळू बंद पडत आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुंबई – पुणे परिसरात आलेल्या विद्यार्थ्यांवर यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही, तर घरगुती गॅसचीही मोठी टंचाई निर्माण होईल. त्यामुळे राज्य सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालून केंद्राशी चर्चा करावी व तोडगा काढावा. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा रोहिणी खडसे यांनी दिला आहे.




