आयुर्वेदिक औषध निर्मिती कंपन्यांवर तुकाराम मुंढे यांचा बडगा , १० कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द

मुंबई – सध्याच्या काळात नैसर्गिक आणि घरगुती उपचारांकडे वाढलेला कल पाहता अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक उत्पादनांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राज्यातील काही कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण औषधनिर्मिती क्षेत्रात खळबळ माजली आहे. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अत्यंत कडक भूमिका घेतल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर राबवण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेमध्ये राज्यातील तब्बल १० आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश यातून देण्यात आला आहे. या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने एकूण ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची बारकाईने तपासणी केली. या विस्तृत पडताळणी प्रक्रियेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, तब्बल १३५ संस्थांना त्यांच्या कारभारातील अनियमिततेबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उत्पादन करताना पाळावयाचे नियम आणि निकषांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गंभीर स्वरूपाच्या त्रुटी पथकाला आढळून आल्या. औषधे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पूर्णपणे अभाव तिथे होता. स्वतःचा दर्जा नियंत्रण विभाग नसणे, उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची वानवा आणि कंपनी परिसरातील प्रचंड अस्वच्छता यांसारख्या धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या व्यतिरिक्त, कच्च्या मालाची कोणतीही नोंद न ठेवणे, औषधांच्या वेष्टनावर चुकीच्या तारखा छापणे आणि कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी नसणे अशा अत्यंत गंभीर चुका या कंपन्यांकडून होत होत्या.
ज्या कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. बारामती येथील कृष्णा हर्बल, गोंदिया जिल्ह्यातील करंजा येथील लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, तिरोडा येथील वडेगाव मधील आदित्य फार्मा आणि अंगरस आयुर्वेद, पुणे येथील कालिदास गांधी, सिन्नर येथील शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी, जेजुरी एमआयडीसी मधील इंडकेअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, अमरावती येथील हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर, गोंदियाचे हिलॅरियस आयुर्वेद आणि नाशिक येथील यशोदा लॅब प्रायव्हेट लिमिटेड या १० आयुर्वेदिक संस्थांचा यात समावेश आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या धडक कारवाईनंतर सर्व औषध उत्पादक कंपन्यांना सक्त ताकीद दिली आहे. नागरिकांचे आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता असून औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणाऱ्या कंपन्यांची अजिबात गय केली जाणार नाही. जे व्यावसायिक औषधनिर्मितीच्या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर भविष्यातही याहून अधिक कठोर आणि थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.



