मानदेऊळगाव येथे ८१ फूट उंच तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारणी

जालना – जालना शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला वसलेल्या मानदेऊळगाव येथे ८१ फूट उंच तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्यात आली असून, राज्यातील सर्वांत उंच बुद्धमूर्ती म्हणून या स्थळाची ओळख निर्माण होणार आहे. अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या जालना-जळगाव मार्गावरच हे ठिकाण आहे. या उपक्रमामुळे परिसरात धार्मिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
डोंगराच्या खोदकामासाठी जेसीबीद्वारे दोन महिने काम झाले असून त्यासाठी १२ लाख रुपये खर्च आला. २१ फूट स्ट्रक्चरच्या बांधकामासाठी ५५ लाख आणि मुख्य बुद्धमूर्तीसाठी ७४ लाख असा एकूण मिळून जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी झाला आहे.
ही चार टनांची भव्य बुद्धमूर्ती छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरातील कुशल कारागिराने हुबेहूब घडवली आहे. बुद्धमूर्ती बसविण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. १ मार्च रोजी म्यानमार, थायलंड, जपान, बौद्ध गया, नेपाळ, व्हिएतनाम आणि तिबेट आदी विविध देशांतील भिक्खू संघांनी या स्थळाला भेट देऊन वंदन केले आणि समाधान व्यक्त केले.
२० एकर जागेत पर्यटनस्थळ विकसित करणार
या परिसरातील २० एकर जागेत भव्य धार्मिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा मानस विलास डोळसे यांनी व्यक्त केला आहे. येथे विपश्यना हॉल (Meditation Hall), बौद्ध विहार, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था आणि मुक्कामी थांबणाऱ्या उपासक-उपासिकांसाठी भोजनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा –
या भव्य बुद्धमूर्तीचा ३१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती डोळसे यांनी दिली. मानदेऊळगाव हे लवकरच राज्याच्या धार्मिक पर्यटन नकाशावर आपले ठळक स्थान निर्माण करेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
बौद्धगया येथून घेतली प्रेरणा .
“मी जेव्हा बौद्धगया येथे भेट दिली होती, तेव्हा तेथील ८० फूट उंच बुद्धमूर्ती पाहून प्रेरणा घेतली. महाबोधी मंदिर परिसरातील भव्यतेने प्रभावित होऊन आपल्या परिसरातही अशीच दिव्य आणि भव्य बुद्धमूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता. आज त्या संकल्पाची पूर्तता करत मानदेऊळगाव येथे ८१ फूट उंच बुद्धमूर्ती साकारली आहे.”



