महाराष्ट्र
जगप्रसिद्ध बौद्ध लेणीमध्ये १० मार्च रोजी किरणोत्सव

छत्रपती संभाजीनगर -दरवर्षी १० मार्च रोजी वेरूळ लेणी क्रमांक १० मध्ये
दोन सूर्याची भेट होते. एक म्हणजे आवकाशातील प्रकाश सूर्य आणि दुसरा या धरणीवरील अखंड मानवजातीला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवणारा ज्ञानसूर्य तथागत गौतम बुद्ध यांच्या भेट संगमाचा
दिवस..!
लेणीवर होणाऱ्या या सोहळ्याला ‘किरणोत्सव’ म्हटले जाते, तो केवळ प्रकाशाचा खेळ नसून भारत भूमीच्या बौद्धकालीन उच्चकोटीच्या वैज्ञानिक वास्तू स्थापत्याचा पुरावा आहे.
तसा किरणोस्तव सूर्य मावळतीला जात असताना सायंकाळी ४:३० ते ५:१० या वेळेत सूर्यकिरणे लेणी गवाक्षातून लेणीमध्ये प्रवेश करतात आणि चैत्यगृहातील तथागत गौतम बुद्धांच्या आसनस्थ मूर्तीच्या मुखावर पडतात.संपूर्ण लेणी उजळून निघते.ही रचना केवळ कलात्मक नाही.ती अतीसूक्ष्म (अत्यंत बारकाईने केलेल्या) गणित आणि खगोलीय ज्ञानाचा अविष्कार आहे.
प्राचीन भारतीय बौद्ध वास्तुकारांनी सूर्याच्या वार्षिक प्रवासाचा अभ्यास करून ही लेणी उभारलेली आहे. कारण किरणोत्सव पाहिल्यावर घटना योगायोग नसून नियोजनबद्ध वास्तूरचना असल्याचे आपणांस समजून येते.
सूर्य उत्तरायणाकडे म्हणजे (सूर्याचे दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे (उत्तरेकडे) होणारे भ्रमण,
सूर्य उत्तरेकडे प्रवास करत असताना त्याच्या किरणांचा अचूक कोन साधून मूर्तीवर पडणारा हा प्रकाश म्हणजे प्राचीन खगोलशास्त्र, स्थापत्य तसेच अध्यात्म यांचा “त्रिवेणी” संगम आहे.
“किरणोत्सव”हा म्हणून केवळ एक वार्षिक दृश्य सोहळा नाही. तो आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक दृष्टीचा आणि आध्यात्मिकतेचा जिवंत पुरावा आहे. ही रचना केवळ योगायोग नसून, प्राचीन शिल्पकारांनी सूर्याच्या गतीचा, दिशांचा आणि ऋतूंचा अभ्यास करून उत्कीर्ण केलेली वास्तू आहे. स्थापत्य – खगोलशास्त्र यांचा अनोखा मिलाफ आहे. हा नयनरम्य सोहळा पाहिला की बौद्ध कालखंडातील ज्ञानवैभवाचा अभिमान वाटल्या शिवाय राहत नाही.
९ आणि ११ मार्च सुद्धा हा किरणोत्सव
अनुभवता येतो.मात्र १० मार्च हा मुख्य दिवस मानला जातो.कारण त्यादिवशी सूर्यकिरण बुद्ध मूर्तिच्या मुखावर अगदी सरळ रेषेत येतात आणि स्थिरवतात. बाकी ९ आणि ११ तारखेला सूर्याची किरणे थोडी तिरपी होतात (आपली कला) बदलतात.
यंदा १० मार्च रोजी मंगळवार असल्याने लेणीची साप्ताहिक सुट्टी असल्याने संपूर्ण वेरूळ लेणी बंद असणार आहे. त्यामुळे या दिवशी हा अद्वितीय क्षण अनुभवता येणार नाही. निसर्गप्रेमी पर्यटक, अभ्यासक, आणि लेणी संवर्धक ९ मार्च किंवा ११ मार्च या दिवशी हा सोहळा पाहू शकतात.




