तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित नोकरदार वर्गाला परखड सवाल

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुजन समाजातील सुशिक्षित आणि नोकरदार वर्गावर कडक शब्दांत परखड सवाल केला आहे. यूजीसीच्या (UGC) नवीन नियमावलीला होत असलेला विरोध आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर, “तुम्ही चळवळीसाठी नक्की काय करत आहात?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
नेमके प्रकरण काय?
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा जाती, धर्म, वंश, लिंग आणि दिव्यांगत्वावर आधारित भेदभाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू केले होते. या नियमांचा मुख्य उद्देश एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हा होता. मात्र, सवर्ण आणि काही विशिष्ट गटांनी या नियमांविरोधात आंदोलने केली. या आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टाने या नियमांना स्थगिती दिली आहे.
आंबेडकरांचे जळजळीत प्रश्न
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रस्थापित मानसिकतेवर आणि शांत बसलेल्या बहुजन वर्गावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जातिवादी गट रस्त्यावर उतरून निदर्शने करत असताना तुम्ही काय केले? तुम्ही रस्त्यावर का उतरला नाही?” “तुम्ही काय फक्त बाबासाहेबांच्या संघर्षाचा आणि आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आहात का?” असा सवाल त्यांनी नोकरदार वर्गाला केला आहे.
तुम्ही कितीही प्रगती केली तरी जातिवादी मानसिकता तुम्हाला तुमच्या जातीच्या चष्म्यातूनच पाहते, याची जाणीव त्यांनी करून दिली आहे.
रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या उदाहरणांचा संदर्भ देत, “तुमची मुले पुढील बळी ठरावीत असे तुम्हाला वाटते का?” असा टोकदार सवालही त्यांनी केला आहे.
आजी-आजोबा आणि आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून ही चळवळ जिवंत ठेवली, पैसा आणि वेळ दिला, म्हणूनच आजची पिढी सुखी आहे. मात्र, ही पिढी आता इतिहासाचा भाग होत असताना नवीन पिढी आणि सुशिक्षित वर्ग चळवळीसाठी काय योगदान देत आहे, असा प्रश्न विचारून आज आपल्या न्याय हक्क अधिकारांसाठी रस्त्यावर उतरला नाही, तर पुढची पिढी माफ करणार नाही, असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.



