मायकाळजाची माऊली म्हणजे आरोग्य सेविका – कविवर्य सुरेश शिंदे

सौ देवयानी कदम यांचा सेवापूर्ती निमित्त विशेष नागरी कृतज्ञता सन्मान संपन्न…
करमाळा ( आयुब शेख )
कंदर येथे आरोग्य सेविका सौ देवयानी जगदीश कदम यांच्या सेवा पूर्ती निमित्त विशेष कृतज्ञता नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील व अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध कवी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागामध्ये तब्बल 36 वर्षे प्रदीर्घ सेवा बजावलेल्या सौ. देवयानी कदम यांचा यशकल्याणी संस्थेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना
प्रा. गणेश करे पाटील यांनी सौ कदम यांच्या आरोग्य सेवेचा व श्री कदम यांचा देश सेवेतील व सामाजिक योगदानाबद्दल यथार्थ शब्दात गौरव केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश शिंदे यांनी आरोग्य सेविका म्हणजे मायकाळजाची माऊली असे देवयानी कदम यांच्या सेवेचे महत्व विशद करत सेवाकार्य व संस्कार यांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी व्यासपीठावरून करमाळा तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूरजी शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनीही आपल्या मनोगतामधून कृतज्ञता व्यक्त केली. सौ कदम यांच्या सेवाकार्याचा गौरव सौ जयश्रीताई राऊत, सौ अनिता राऊत राजेभोसले, कोल्हापूर येथील जिल्हा सैनिक संघटनेचे सचिव बी जी पाटील, माजी पोलीस अधिकारी बबनराव साळुंखे, उत्तमराव आसबे, केम येथील वैद्यकीय अधिकारी शशिकांत उबाळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
यावेळी जीवन शिक्षण फाउंडेशनच्या
वतीने जयेश पवार व माजी अंगणवाडी सेविका सौ शालिनी शिंदे यांनी श्री व सौ कदम यांचा सन्मान केला.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी कंदर येथील उद्योजक सुभाष पवार, युवानिर्माण करिअर अकॅडमीचे संचालक गणेश लोकरे, किशोर इंगळे आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, कंदर व केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, कंदर व सौंदे येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विष्णु शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन महेश कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक जगदीश कदम यांनी केले.



