२ जानेवारी हुतात्मा भाई कोतवाल स्मृतिदिन

२ जानेवारी हुतात्मा भाई कोतवाल स्मृतिदिन.
केवळ फंदफितुरीने इंग्रजांच्या जाळ्यात अडकून अवघ्या ३१ व्या वर्षी हुतात्म्य मिळालेला तेजपुंज तारा म्हणजे विठ्ठलराव लक्ष्मणराव उर्फ भाई कोतवाल.एकीकडे स्वातंत्र्यासाठी परकियांसोबत तर दुसरीकडे गरीब शेतक-यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी स्वकियांसोबत लढाई, अशा दोन्ही लढाया त्याग आणि प्रखर देशभक्तीच्या कसोटीवर लढणारा हा महायोद्धा म्हणजे वीर भाई कोतवाल. इतिहासाने त्याची फारशी दखल घेतली नसली तरी स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्याग व बलिदान कधीच व्यर्थ जाणारं नाही. त्याची तुलना शहीद भगतसिंग, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा क्रांतिकारकांशीच करावी लागेल.
असंख्य स्वातंत्र्यसेनांनीप्रमाणेच भाई कोतवाल यांची ही देदीप्यमान आणि रोमहर्षक गाथा काहीशी दुर्लक्षित राहिली आहे.हुतात्मा भाई कोतवाल यांचे कार्यक्षेत्र नेरळ, माथेरान आणि कर्जत असले तरी त्यांच्या कार्याचा दूरगामी प्रभाव त्याचवेळी राज्यभरातील स्वातंत्र्यचळवळीवर पडला होता. माथेरानसारख्या इंग्रजांनीच वसवलेल्या हिल स्टेशनचे उपनगराध्यक्ष ते इंग्रजांच्याच दमनशक्तीविरोधात उभे ठाकून गनिमी काव्याने त्यांना हैराण करत हौतात्म्य पत्करणारे लढवय्ये हा त्यांचा प्रवास एखाद्या थ्रिलरपटातील नायकाला शोभेल असाच आहे. कोणासाठी ते कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देणारे वकिल होते, गरीब शेतक-यांसाठी ते त्यांच्या हक्कांसाठी भांडणारे भूमीपुत्र होते, कोणाला त्यांच्यात रॉबिनहूड दिसत होता, तर ब्रिटिशांसाठी ते गनिमी काव्याने लढणारे क्रांतिकारक होते. दळणवळणाची कुठलीही साधने नसताना केवळ भारतमातेच्या प्रेमापोटी भरल्या संसारावर पाणी सोडून कोतवाल स्वातंत्र्यवेदीवर हसत हसत बळी गेले.
अफाट बुध्दीमत्ता,अचाट कर्तुत्व,पराकोटीचे मातृप्रेम,कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरानमध्ये १ डिसेंबर १९१२ रोजी एका गरीब कुटुंबात झाला.इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण माथेरानच्या शाळेमध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले.मॅट्रिक परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ते पहिले आले.पुढे कायद्याचे शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये पूर्ण करून ते अॅड. विठ्ठल लक्ष्मण कोतवाल झाले. १९३५ मध्ये पुण्यामध्ये असताना त्यांचा विवाह इंदू तुकाराम तीर्लापुरकर यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले झाली. मुलगा भारत आणि मुलगी जागृती. पण दुर्दैवाने मुलगी केवळ दोन महिन्याची असतानाच तिचा मृत्यू झाला.
हुतात्मा कोतवाल यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित केला.पुण्यात शिक्षण घेताना शि.म.परांजपे यांच्या काळमधील लेखांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. वि.दा.सावरकरांचे १८५७चे स्वातंत्र्य समर, तसेच जोसेफ मॅझिनी,गॅरी बोल्डी यांच्या पुस्तकांनी त्यांच्या मनातील स्वातंत्र्याच्या उर्मी जागृत केल्या.त्यामुळं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी गवालिया टंक येथील सभेत महात्मा गांधी यांनी ब्रिटीश राजवटीला “चले जाव“ चा नारा दिला त्यावेळी भाई कोतवाल सुद्धा उपस्थित होते. ब्रिटीश सरकारने सर्व नेत्यांची अटक सुरु केली. भाई कोतवाल यांच्यावरही अटक वॉरंट निघाला. त्यावेळी “जगेन तर स्वातंत्र्यात नाहीतर स्वर्गात” अशी शपथ घेऊन भूमिगत झाले. भाई कोतवाल यांनी भूमिगत होऊन एक समांतर सरकार चालवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी आगरी, कातकरी, शिक्षक, शेतकरी यांचा एक दस्ता बनविला. यामध्ये जवळपास ५० वीरांचा समावेश होता. तो दस्ता म्हणजेच “कोतवाल दस्ता”. माथेरान नगरपालिकेचं उपनगराध्यक्षपद भूषवणाऱ्या भाई कोतवाल यांनी ‘आझाद हिंद दस्ता’ची स्थापना करून स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी लढा उभारला होता. भाई कोतवाल,हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारला अक्षऱशः सळो की पळो करून सोडलं होतें. त्यांचा “आझाद दस्ता” रेल्वेचे रूळ उखडून टाकायचा, विजेच्या तारा तोडायचा अन्य घातपाती कारवाई करून जंगलात पसार व्हायचा. सप्टेंबर १९४२ ते नोव्हेंबर १९४२ या दरम्यानच्या काळात त्यांनी एकूण ११ विजेचे मनोरे उद्वस्त करून ब्रिटीश उद्योग आणि रेल्वे ठ्ठप करून टाकली. या गनिमीकाव्यामुळं सरकार त्रस्त झालं होतं. मात्र, जंग जंग पछाडल्यानंतरही भाई आणि त्यांच्या साथीदारांना पक़डण्यात सरकारला यश येत नव्हतं. खोपोलीच्या डोंगरदर्यातील विद्युतखांब एकामागोमाग एक आडवं करून ब्रिटिश सरकारची नांगी ठेचण्याचं काम भाईंनी स्वातंत्र्याच्या लढाईत केलं. परिणामी दुस-या महायुद्धाच्या वेळी पुणे परिसरातून पाठवला जाणारा दारुगोळा युद्धभूमीवर खंडित वीजपुरवठय़ामुळे पोहोचवणं ब्रिटिशांना अवघड झालं. त्यामुळे अगदी रडकुंडीला आलेल्या ब्रिटिशांवर भाईंना जिवंत अथवा मृत पकडण्यासाठी त्यांच्या शिरावर अडीच हजारांचं इनाम ठेवावं लागलं होतं.
ब्रिटीश सरकारने भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी आर हॉल आणि स्टॅफ़र्ड या विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. हॉलने भाईंचा थांग लावण्यासाठी त्यांच्या गावातील लोकांना बेदम मारहाणही केली. पण ‘स्वातंत्र्य हवं असेल तर अंगाची कातडी सोलून देण्याची तयारी ठेवली पाहिजे,’ हा भाईंचा क्रांतिकारी विचार अंगी बाणवलेले गावकरी प्राण गेला तरी बेहत्तर, पण भाईंचा पत्ता सांगणार नाही, यावर ठाम होते. इंग्रजांना नेस्तनाबूत करणा-या भाईंचा पत्ता लावण्यासाठी ते अधिकारी त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. त्यामुळे भाईंनी गाव सोडून सिद्धगडच्या रानात आश्रय घेतला. त्या वेळी त्यांच्यासोबत ‘आझाद हिंद दस्ता’चे अनेक वीर भूमिगत झाले होते. गावातील माता- भगिनींचीही भाईंच्या लढय़ाला साथ होतीच. त्या त्यांना जंगलात नेऊन अन्न पोहोचवत असत. अखेर पैश्याच्या लालसेनं घात केला.कोतवाल दस्ता हा मुरबाड तालुक्यात सिद्धगडच्या जंगलामध्ये होता. त्यांनी पाठविलेले मदतीचे पत्र दुर्दैवाने एका जमीनदाराच्या हाती पडले. बक्षिसाच्या लालसेने त्या जमीनदाराने ते पत्र ब्रिटीश अधिकारी हॉल याला दिले आणि जमीनदाराने पोलिसांना भाईंचा जंगलातील ठावठिकाणा तपशीलवार सांगितला.
दि. २ जानेवारी १९४३ रोजी पहाटे ब्रिटीश पोलीस अधिकारी हॉल स्वत: जातीने १०० सशस्त्र पोलीस शिपायांना घेऊन सिद्धगडावर पोहचला.”आझाद हिंद दस्ता” दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी निघण्याच्या तयारीत असतानाच हॉल आणि स्टॅफ़र्ड फौझानी त्यांच्यावरती हल्ला केला. त्यामध्ये आझाद हिंद दस्त्याचे उपसेनापती गोमाजी पाटील यांचा मुलगा हिराजी पाटील जागीच मृत्यूमुखी पडले. सिद्धगडावर भाईंना इंग्रजानी वेढले. गोळीबाराला न जुमानता भाई लढले, पण एका गोळीने त्यांच्या मांडीचा वेध घेतल्याने जखमी अवस्थेत झाडाखाली पडले असतानाच क्रूरकर्मा इंग्रज अधिकारी हॉलने जवळ जाऊन बंदुकीची नळी डोक्याला लावून चाप ओढला आणि एक धगधगता अंगार थंड झाला. अखेर सिध्दगडच्या पावनभूमीत रायगडचा हा सुपूत्र हुतात्मा झाला. तो दिवस होता २ जानेवारी १९४३ चा.
भाई कोतवाल यांचे स्मारक सिद्धगडाच्या पायथ्याशी आहे. मुरबाड तालुक्याच्या इतिहासाचे रक्तरंजित पान ठरलेल्या आणि हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या सिद्धगडाच्या धारातीर्थी भूमीत नतमस्तक होण्यासाठी गर्दी जमते. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात या हुतात्मा स्मारकावर पहिला दिवा ‘साने गुरुजीनी’ लावला.तेव्हापासून दरवर्षी हजारो देशप्रेमी येथे १ जानेवारीलाच हजर होतात. रात्रभर सांस्कृतीक, देशभक्तीपर कार्यक्रम होऊन पहाटे ६.१० वाजता क्रांतीज्योत पेटविली जाते.



