माय मनाचा बाप माणूस सानेगुरुजी

माय मनाचा बाप माणूस सानेगुरुजी तथा पांडूरंग सदाशिव साने यांचा २४ डिसेंबर जन्मदिवस.
मला असे वाटते की, साने गुरुजी हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कधी आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही. कधी त्यांना आपण उदात्त मातृभक्तीत गुरफटवून टाकले तर कधी त्यांच्या भाबडेपणावर उगाच हसून खिल्ली उडवली;पण त्यांच्या विचारांचा टीकात्मक पद्धतीने उहापोह करण्याचा प्रयत्न कितीजणांनी केला आहे? त्यांनी स्थापिलेल्या ‘आंतरभारती’सारख्या संस्थांचे महत्व आपल्याला पटलेले आहे का? लोकांपर्यंत त्यांचे महत्व पोचलेले आहे का? मला माहीत नाही. आजच्या काळात जिथे स्वतःच्या भाषेतील साहित्यच तरुणांना परिचित नाही, तिथे साने गुरुजींचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व दुर्लक्षित राहिल्यास नवल नाही. कदाचित हेच त्यांचे आणि आपले दुर्दैव आहे.
त्यांच्या वाढदिवशी त्यांचाच शब्दांत आशा व्यक्त करावीशी वाटते-
‘हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
बलसागर भारत होवो!’
कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, १८९९ रोजी गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली.त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दु:खी’ या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला.
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती
गुरु जी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात. दररोज पाचपंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत. इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. यावेळी त्यांचा देशाभिमान, मातृभूमीवरील भक्ती उचंबळून येत असे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत. गुरु जी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांचे स्वत:चेच तंत्र बनविले होते. ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते. मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत.
वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर गुरुजींचा भर होता. त्यांनी छात्रालयाचे काम बघायला सुरुवात करताच छात्रालयाचे अनाथपण गेले. ते मुलांना शिस्तीतून बदलवण्यापेक्षा प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करीत. गुरु जी गोड प्रार्थनागीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर, पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरु जी मुलांना उठवत. कोरडेच रुक्ष उपदेशाचे घोट उठता बसता त्या बालजिवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय देत.
छात्रालयात मुले कपडे धूत नसत. खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके, सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत. मुले शाळेत गेली की साने गुरु जी गुपचूप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत, कंदिलाच्या काचा पुसून ठेवत. मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुले म्हणायची, ‘‘आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय?’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘अरे, आई का मुलाला लाजविण्यासाठी हे सारे करत असते?’’
साने गुरुजी म्हणजे माय मनाचा बाप माणूस. त्यांचे काय आजही प्रेरणादायीच आहे. राजकारण, साहित्य, समाजकारण अशा क्षेत्रात त्यांनी आपला ठस्सा उमटवला. परंतु, या संवेदशनील समाजसुधारकाने ११ जून १९५० रोजी सभोवतालची सामाजिक-राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनःस्थितीत मुंबई येथे त्यांनी आत्महत्या केली.
– योगेश शुक्ल 



