सामाजिक

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले……? 

 

न्यूज 18 लोकमत या चॅनेलवर आज विलास बडे यांनी घेतलेल्या बडे मुद्दे चर्चेत नगरपालिका निवडणुकीत होत असलेले गुन्हेगारीकरण यावर चर्चा झाली.. त्यात गुन्हेगार राजकारणाकडे का येऊ लागले याचे विश्लेषण करता आले… ते मांडताना मी व पु काळे यांची एक प्रसिद्ध कथा सांगितली..

रात्रीच्या वेळी एका रातराणी बस मध्ये झोपताना हात अवघडू नये म्हणून ते एसटीच्या मधल्या दांडीवर टांगून ठेवण्याची सोय असते. एक गुंड आणि लेखक प्रवास करताना सकाळी दोघांच्या हाताची अदलाबदल होते. गुंड पुस्तके लिहू लागतो आणि लेखक खिसे कापू लागतो. वैतागून लेखक गुंडाला गाठतो आणि हात परत मागतो. तेव्हा गुंड म्हणतो की माझ्याकडे पैसा होता पण प्रतिष्ठा नव्हती आणि तुमच्याकडे प्रतिष्ठा होती पण पैसा नव्हती. तेव्हा दोघांचेही आता बरे चालले आहे…
मला असे वाटते की गुंडांचा राजकारणातला प्रवेश हा या मानसिकतेतून झाला आहे.राजकारणी पूर्वी गुंडांशी आणि धनिकांशी अंधारात संबंध ठेवायचे आणि बदनामी मात्र गुंडांची व्हायची…गुंडांच्या हे लक्षात आले की आपण बदनामी झेलण्यापेक्षा आणि पाठीमागून मदत करण्यापेक्षा थेट आपणच राजकारणात आलो तर कुठे बिघडले ?

धनिक सुद्धा तोच विचार करतात.त्यामुळेच शहरी भागातले बिल्डर आणि ग्रामीण भागातले ठेकेदार आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला जास्त दिसतात कारण नेत्यांना पैसा देण्यापेक्षा आपलाच पैसा लावून आपणच का निवडून येऊ नये ? अशी त्यांची मानसिकता झाली आहे..
सर्वात वाईट हे आहे की नगरपालिका,महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांना नेतृत्वाची कार्यशाळा असे म्हटले जाते.उद्याचे आमदार,खासदार यातून घडतात असे सांगितले जाते. ते खरे ही आहे विलासराव देशमुखांसारखा माणूस सरपंचांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रवास करतो. देवेंद्र फडणवीस नगरसेवक हे मुख्यमंत्री असा प्रवास करतात. अशा महाराष्ट्रात आज अशा प्रकारचे गुंड जर स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येणार असतील तर उद्याचे आमदार, खासदार कसे असतील ? याची कल्पनाही करवत नाही….

बिहारची बदनामी आपण का करतो ? महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही हा बकवास आता बंद केला पाहिजे…बिहारच्या २०२० च्या निवडणुकीत ६८% उमेदवार आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते ते प्रमाण १५% ने या निवडणुकीत कमी झाले आणि महाराष्ट्रातील ४१ टक्के आमदारांवर मात्र वेगवेगळे गुन्हे आहेत.. तेव्हा बिहारचाच महाराष्ट्र होतो काय असा प्रश्न पडतो..?

देशपातळीवर १९९३ साली राजकारणाचे गुन्हेगारीकरण यावर चर्चा करण्यासाठी व्होरा समिती नेमली होती.. या समितीतील तपशील इतके भयंकर आहेत . आजपर्यंत एकाही सरकारने या समितीचा अहवाल संसदेसमोर ठेवला नाही किंबहुना मध्यंतरी माहितीच्या अधिकारात रिपोर्ट मागितल्यावर तो उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले… तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार निवडणूक यांच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उद्याच्या महाराष्ट्राचा विचार करून अशा गुंडांना दूर ठेवण्याची गरज आहे

दुर्दैवाने तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी भाषा शिवसेनेने वापरली त्यानंतर १९९० च्या निवडणुकीत कलानी आणि ठाकूर यांना काँग्रेसने तिकीट दिले त्याचे समर्थन करताना पवारांनी त्यांच्याकडे इलेक्ट्रिक मेरिट होते असे समर्थन केले आणि त्यानंतर मात्र राजकारणाचा तोल गेला…

सामना चित्रपटात मारुती कांबळे चे काय झाले..? हा प्रश्न सामान्य माणूस अखेरपर्यंत विचारत राहतो.. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना मारुती कांबळे ची काय झाले हे विचारले पाहिजे आणि सरसकट गुंडांना पराभूत केले पाहिजे तरच उद्याचा महाराष्ट्र हा सुसह्य असेल……१०५ हुतात्म्यांनी असे गुंड सत्तेवर यावेत म्हणून जीव दिला का….?

हेरंब कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button