देश - विदेश

संसदरत्न पुरस्काराने खा. वर्षा गायकवाड यांच्या कामाची देशात दखल 

 

मुंबई –
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला. मुंबईकरांना भेडसावणा-या समस्या व मुंबईच्या विकासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेच्या सदस्या म्हणून त्यांची ही पहिल्याच टर्म आहे आणि पहिल्या वर्षातच त्यांनी संसदेत आपला ठसा उमटवला आहे. मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी करताना लोकशाहीतील सर्व आयुधांचा वापर त्या करतात. जनतेने आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले त्यांनी जनतेचा आवाज उठवणे अपेक्षीत असते. आपल्याच टर्ममध्ये वर्ष भराच्या कामाने त्यांनी मुंबई, महाराष्ट्र व आपल्या मतदारसंघाचे नाव देशात केले आहे.

काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या उमदेवार म्हणून लढवली आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील जनतेने त्यांना विजयी करून लोकसभेत पाठवले. याआधी त्यांनी धारावी विधानसभा मतदार संघातून सलग चारवेळा विजय मिळवलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर भेट घेतली असता शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, माझ्या बहिणीला मी मतदान करून संसदेत पाठवणार, असा शब्द दिला व तो खरा करून दाखवला. मुद्दा हा नाही की वर्षा गायकवाड यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली व त्या विजयी होऊन लोकसभेत गेल्या, लोकसभेत त्यांचा पहिलाच अनुभव असतानाही त्यांनी आपल्या कामातून स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. लोकसभेच्या कामकाजात भाग घेत त्यांनी विविध विषय मांडले. केवळ आपल्या मतदार संघातीलच प्रश्न मांडून त्या थांबल्या नाहीत तर मुंबईतील सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न त्यांनी मांडले. २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १५ व्या क्रमांकावर येणे हे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. वर्षाताईंचे कठोर परिश्रम, सखोल ज्ञान आणि जबाबदाऱ्या हाताळण्यातील कार्यक्षमता यामुळेच त्यांनी उल्लेखनीय यश मिळाले आहे. लोकसभेतील त्यांची सुरुवात पाहता खासदार म्हणून संसद रत्न पुरस्कारासाठी त्या एक अतिशय प्रबळ दावेदार दिसत होत्या.

खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाला तसेच मुंबईला एक अत्यंत प्रभावी नेतृत्व मिळालेले आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी समाजाला भेडसावत असलेल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. जनतेचे प्रश्न मांडून सरकारकडून ते सोडवून घेणे, जनतेला न्याय देणे हे लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्यच आहे. अनेक लोकप्रतिनिधी भाषणात मोठ मोठी आश्वासने देतात पण त्याचे पुढे काय होते हे कळत नाही. आपल्या मतदार संघात काही समस्या आहेत का याच्याकडेही त्यांचे फारसे लक्ष नसते पण वर्षा गायकवाड त्याला अपवाद आहेत. खासदार वर्षा गायकवाड या आपल्या मतदारसंघातील प्रश्न हिरीरीने मांडतात व जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत.

लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक कार्याचा वारसा खासदार वर्षा गायकवाड यांना लाभाला आहे. लोकनेते एकनाथराव गायकवाड हे जनतेच्या सतत संपर्कात असायचे, त्यांचा जनसंपर्कही प्रचंड दांडगा होता, लोक त्यांना भेटून आपल्या समस्या सांगत असे व तेसुद्धा त्या सोडवण्याचा प्रयत्न करत. तोच वसा खासदार वर्षाताई गायकवाड चालवत आहेत.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तसेच खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत मुंबईकरांना भेडसावणारे प्रश्न मांडले. मुंबईकरांची लाईफलाईन लोकल रेल्वेसंदर्भातील प्रश्न मांडून मुंबईकरांना चांगली लोकल सेवा मिळावी यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. रेल्वेसंदर्भात इतरही महत्वाचे प्रश्न त्यांनी मांडले. अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठी राखीव असलेला निधी हा अनुसूचित जाती-जमाती समुदायाच्या शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण व आर्थिक विकासासाठीच व्हायला हवा पण तो त्यांच्या हातात न पडता इतर योजनांत वळवला जात असून हा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी अशी आग्रही मागणी खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी संसदेत केली. तसेच मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणून झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याचे प्रयत्न होत आहेत. यासंदर्भात आवाज उठवत मुंबईतील सर्व कोळीवाडे व गावठाणे यांचे सीमांकन व मॅपिंग करण्याची मागणी लोकसभेत केली. विमानतळावर UDF सह विविध शुल्क आकारून प्रवाशांची लूट केली जाते, ती लूट थांबवावी व पारदर्शकता वाढवून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यावर भर द्यावा, हा मुद्दाही लोकसभेत मांडला.

खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांची जनतेप्रती असलेली निष्ठा व तत्परता यातून त्या कशाचीही तमा न बाळगता सरकारच्या सर्व व्यासपीठांवर जनतेचे प्रश्न मांडत आहेत. लोकसभेतील त्यांची ही पहिलीच टर्म असतानाही त्यांची सुरुवात धडाकेबाज झाली आहे व पुढील पाच वर्ष त्या मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न मांडत राहतील. महाराष्ट्रातून लोकसभेत गेलेल्या रणरागिणीने आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button