महाराष्ट्र
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे – राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून, येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात विविध भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटपरिसर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून 25 ते 27 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि मुंबई दाखल होईल तर दुसऱ्या आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल असं सांगितलं जात आहे.
