राजकीय
अक्कलकोट मतदार संघात भाजपाकडून इच्छुकांची संख्या वाढली !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
काँग्रेस मध्ये अद्याप हलचाली थंडच !
अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सुप्रीम कोर्टाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरुवात झाली असून भाजपात इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. तर काँग्रेस पक्षात अद्यापि थंडच वातावरण असल्याने काँग्रेस पक्ष कशाप्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण तीन नगरपालिका , पंचायत समिती बारा गण , सहा जिल्हा परिषदेचे गट आहेत. अक्कलकोट , दुधनी , मैंदर्गी या नगरपालिका आहेत. सध्या अक्कलकोट नगरपालिकेत भाजपा , दुधनी नगरपालिकेत काँग्रेस पक्ष तर मैंदर्गीत स्थानिक आघाडीचे वर्चस्व आहे. अक्कलकोट पंचायत समितीमध्ये दोन गण , जिल्हा परिषद गटात एक गट वाढल्याने आता पंचायत समितीचे चौदा आणि जिल्हा परिषदेचे सात गट झाले आहेत .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची ताकद वाढली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नियोजनबद्धरीत्या संघटनात्मक काम केले आहे. भाजपा पक्ष हा तळागाळातील जनतेमध्ये पोहोचविण्याचे काम आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नुकतीच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर ही सत्ता मिळवत राजकीय क्षेत्रात धबधबा निर्माण केला आहे. भाजपाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवार हे जवळपास निश्चित झाल्याने भाजपात उत्साहाचे वातावरण आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा चौफेर उधळणारा राजकीय वारू रोखण्याचे आव्हान विरोधक पेलणार का ? हा सवाल राजकीय क्षेत्रातील जाणकारातून व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विरोधकांची कोंडी केली आहे. ही कोंडी विरोधक फोडणार कसे हे पहावे लागणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे करणारे नेतृत्व सध्या विरोधकात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही भाजपासाठी सोपी वाटत आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच राजकीय लढाई आतापर्यंत झाले आहे .सध्या काँग्रेस पक्षात मरगळ आली असून काँग्रेस पक्षातील नेत्यात समन्वयाचा अभाव आहे. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले पण सध्या ते काँग्रेस पक्षाच्या मोर्चे बांधणी पासून दूर राहत असल्याने तालुक्यात वेगळी चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या हायकमांडना जुन्या नेत्यांसोबतच नवीन नेतृत्वाचा शोध आगामी काळात घ्यावा लागणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या नव नेतृत्वाला संधीही काँग्रेस हायकमांडला द्यावी लागणार आहे. जुने आणि नवीन नेतृत्वात सांगड घालण्याचे काम काँग्रेस पक्षातील वरिष्ठांना करावी लागणार आहे. तरच अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाचे विचारधारा जिवंत राहणार आहे असे काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे. यामुळे काँग्रेस पक्षासमोर भाजपाचे तगडे आव्हान असणार आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गट , वंचित बहुजन आघाडी , शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट , आरपीआय आठवले गट यांची ही भूमिका ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला तरी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासमोर तग धरणारे नेतृत्व विरोधकातून उभे असल्याचे दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आणखीन मोठा कालावधी असून पुढील काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींना पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.