सामाजिक

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीदिन

‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत बाबासाहेब, प्रिय रमाई बद्दल लिहितात की, ‘जिच्या त्यागामुळे मला महत्त्व प्राप्त झाले; अंतःकरणापासूनचा चांगुलपणा, मनाचा उदात्तपणा, चारित्र्यातील निष्कलंकपणा जपणारी आणि माझ्यावर ओढवलेल्या संकटांना अगदी शांत चित्ताने तोंड देणारी, माझ्या प्रत्येक दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी, माझ्यावर होणाऱ्या आघातामध्येही मला एकाकी पडू न देता माझे मनोधैर्य उंचावणारी, अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस अर्पण.”

बाबासाहेबांचे रमाईवर असीम प्रेम होते, रमाई त्यांच्या आधार होत्या!

बाबासाहेब शिक्षणासाठी विदेशात गेले असताना त्यांच्या कुटुंबात एकापाठोपाठ एक मृत्यूंचे थैमान घडले, रमाईने त्यास धीराने तोंड दिले!

त्यांनी जे सोसलं ते विदेशात असणाऱ्या बाबासाहेबांनाही कळू दिलं नाही!

समर्पण, त्याग, संयम आणि सहनशीलता याच्या त्या मूर्तिमंत प्रतीक होत्या!

‘१८९८ साल हे किती हो भाग्यवान, रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान!‘
हे रमाई गौरवगीत दामोदर शिरवळेंनी लिहिलेय.

भीमगीते जितकी गोड आहेतच तितकीच रमाईगीतेही अवीट गोडीची आहेत.

‘नव कोटींची माता ही उदार अंतःकरणाची, रमाई झाली स्फुर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची.. ‘,

‘येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं…’ ही रमाई गौरवगाणी आजही प्रेमस्नेहाने ऐकली जातात.

आपल्या आईचे स्थान रमाईला बहाल करणारे लाखो युवक भोवताली दिसून येतात, त्यांना रमाईचा त्याग ठाऊक आहे नि तिची थोरवी, संयम, सहनशीलताही ज्ञात आहे.

बाबासाहेबांविषयी ऋणभावनेने बोलणारी हरेक व्यक्ती रमाईलाही वंदन करताना दिसते.

प्रज्ञासुर्य बाबासाहेब आंबेडकरांच्या सावली बनून राहिलेल्या रमाईत आपली माय न दिसली तर नवलच होय!

त्या खऱ्या अर्थाने नवकोटींच्या माता आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सहचारिणी होत!

‘समर्पिता‘ ही उपाधी त्यांना सार्थ शोभते! आज त्यांची जयंती!

माता रमाईंना वंदन!

– समीर गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button