महाराष्ट्र

तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत भाविकांना मारहाणीच्या घटना वाढल्या !

 

 पोलीस प्रशासनाला गुंडागर्दीवाले जुमानेनात ! 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या परगावच्या भाविकांना स्थानिक गुंडागर्दी करणाऱ्यांकडून मारहाण करण्याच्या घटना वाढल्या असून यामुळे स्वामी भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाला स्थानिक गुंडागर्दी करणारे जुमानेनात असे चित्र पहावयास मिळत आहे. अक्कलकोट शहरात भाविकांना दमदाटी करणे, मारहाणीच्या घटना वारंवार घडत असून असे प्रकार करणाऱ्या समाजकंटक गुंडांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांतून व स्वामीभक्तातून केली जात आहे.
 अक्कलकोट तीर्थक्षेत्र नगरीत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन  घेण्यासाठी दररोज हजारो भाविक भक्त अक्कलकोट नगरीत येत असतात. सुट्टीच्या दिवशी तसेच पौर्णिमा , गुरुवार, शनिवार ,रविवार या दिवशी भाविक भक्तांची संख्या ही प्रचंड मोठी असते .शेकडो किलोमीटरचा प्रवास करून परगावचे भाविक हे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटात येत असतात. अक्कलकोट शहरात येणाऱ्या परगावच्या भाविकांना या ठिकाणी वेगळेच प्रकार पहावयास मिळत आहे. परगावच्या भाविकांना अरेरावेची भाषा , आर्थिक पिळवणूक तसेच स्थानिक समाजकंटकांकडून गुंडागिरी करून मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे भाविकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दिनांक १३ मे रोजी नाशिक येथील तिघा स्वामी भक्तांना स्थानिक गुंडागर्दी करणाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक येथील स्वामीभक्त उमेश पंडित साळुंके , राहुल बापू साळुंके, सुरेखा नरेंद्र साळुंके ( राहणार तळवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक )यांना स्थानिक टवाळखोरांकडून बेदम महारान करण्यात आल्याची घटना घडली. एक महिलेची छेड काढताना याचा जाब नाशिक येथील भक्तांनी टवाळखोर यांना  विचारल्याने याचा राग आल्याने अज्ञात पाच ते सहा टवाळखोराने स्वामी भक्तांना बेदम मारहाण करून जखमी केली. ही घटना मंदिरापासून हाकेच्या अंतरावर घडली. सदरील स्वामीभक्त हे श्री स्वामी समर्थांचे दर्शन न घेताच सोलापुरातील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकीत झाली आहे. अशा गुंडागर्दी टवाळखोरांमुळे अक्कलकोट नगरीचे नाव खराब होत आहे .अशा घटना  श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, श्री तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात सर्रासपणे घडत आहेत. स्थानिक टवाळखोर गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसून पोलीस प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे राजकीय वरदहस्तांमुळे सोकाळलेले नवगुंड हे परगाव च्या भाविकांनाच मारहाण करत असल्याने अशा टवाळखोरांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी स्थानिकातून तसेच परगावच्या स्वामी भक्तातून केली जात आहे. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची हमी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button