राजकीय
अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा वेग वाढला !

प्रमुख नेते प्रचारात व्यस्त !
अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड )अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्वपक्षीय प्रचाराचा वेग वाढला असून सर्वच पक्षाचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त झाले आहेत .स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे .अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणातील जागांसाठी निवडणूक होत आहेत अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेतेमंडळी हे प्रचारासाठी ग्रामीण भागात दौरे करत आहेत. प्रत्येक गावात वाडीवस्त्यांवर जाऊन नेतेमंडळी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत .अक्कलकोट तालुक्यात भाजपा , शिवसेना , काँग्रेस पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस , वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या वतीने विविध गटामध्ये व पंचायत समिती गणात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. अक्कलकोट तालुक्यातील व विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावात जाऊन जाहीर सभा , पदयात्रा , कॉर्नर सभा , प्रत्यक्ष मतदारांना भेटून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. भाजपाने केलेली विकास कामे याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मतदारांना देत आहेत. अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे साकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मतदाराना घातले आहे. भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची भीस्त ही सर्वस्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावरच असल्याने आमदार कल्याणशेट्टी हे प्रचारासाठी व्यस्त झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांसाठी प्रचार सभा , प्रचार पदयात्रा यांचा सपाटा लावला आहे. अक्कलकोट तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती गणातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपा समोर आव्हान उभे केले आहे. विविध गावात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे प्रचारासाठी भेट देत आहेत .प्रत्यक्ष मतदारांना भेटून शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी अक्कलकोट तालुक्यातील विविध गावात प्रचार सभा घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. काँग्रेस पक्षातर्फे ठराविक ठिकाणीच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाची संपूर्ण प्रचाराची भीस्त ही मल्लिकार्जुन पाटील यांच्यावरच आहे. वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय समाज पक्षातर्फे काही ठिकाणी उमेदवार उभे आहेत. त्या ठिकाणी प्रचार करण्यात येत आहे. मंगरूळ गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रचार सुरू आहे. या गटात तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवानंद पाटील , माजी सभापती संजीवकुमार पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्यां प्रचारासाठी फिरत आहेत.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बोरामणी , कुंभारी , वळसंग गटामध्ये सुद्धा भाजपा, शिवसेना , काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील प्रचाराचा वेग वाढला असून भाजपा , शिवसेनेसह काँग्रेस पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस , वंचित बहुजन आघाडी , रासपचे नेते गावागावात वाडीवस्तांवर प्रचार करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे.




