सामाजिक

कै. सुभाष पेरकेवार यांना नायगांव तालुका पत्रकार संघाची भावपूर्ण श्रद्धांजली

ग्रामीण पत्रकारितेचा निर्भीड आवाज काळाच्या पडद्याआड…

नायगाव / नांदेड ( प्रतिनीधी )
नायगांव तालुक्यातील ग्रामीण पत्रकारितेला दिशा देणारा, सामाजिक बांधिलकीचा आणि सत्यनिष्ठेचा ठाम आधार असलेला निर्भीड आवाज अखेर शांत झाला. नरसी येथील दै. प्रजावाणीचे ज्येष्ठ पत्रकार कै. सुभाष संभाजी पेरकेवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सुमारे पंचवीस वर्षे पत्रकारितेत सक्रिय असलेल्या कै. पेरकेवार यांनी आपल्या धारदार लेखणीच्या बळावर ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, वंचित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणे, प्रशासनाला जाब विचारणे आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणे—हीच त्यांच्या पत्रकारितेची खरी ओळख होती. प्रामाणिकपणा, निर्भीडता आणि सामाजिक जाणीव यांचा सुरेख संगम त्यांच्या लेखनातून सातत्याने दिसून येत असे.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर नायगांव तालुक्यातील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी (दि. २४) नरसी येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. पेरकेवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी उभे राहून एक मिनिट मौन पाळत या निर्भीड पत्रकारास अखेरचा सलाम केला.
या श्रद्धांजली सभेस मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, माजी तालुकाध्यक्ष माणिक लोहगांवे, लक्ष्मण बर्गे, गोविंद टोकलवाड यांच्यासह पत्रकार, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध दैनिकांचे प्रतिनिधींनी कै. सुभाष पेरकेवार यांच्या कार्याचा स्मृतिपट उलगडत त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव केला. “त्यांच्या लेखणीने ग्रामीण समाजाला विचारांची दिशा दिली. अन्यायाविरोधातील त्यांची भूमिका प्रेरणादायी होती,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
कै. पेरकेवार यांच्या अकाली जाण्याने नायगांव तालुका पत्रकार संघ पोरका झाल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. मात्र त्यांचे कार्य, मूल्ये आणि सामाजिक भान भावी पिढीतील पत्रकारांसाठी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला गंगाधर भिलवंडे, आनंदराव सूर्यवंशी, शेषेराव कंधारे, गंगाधर गंगासागर, दिलीप वाघमारे, जाफरभाई, नागेश कल्याण, माधव बैलकवाड, देविदास सूर्यवंशी, आजिम भाई नरसीकर, तानाजी शेळगांवकर, हाणमंत चंदनकर, मारोती सूर्यवंशी, प्रकाश महिफळे, कैलास तेलंग, अंकुश देगांवकर, किरण औराळकर, शाम चोंडे, आरिफभाई, प्रमेश्वर जाधव, निळकंठ जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते साईनाथ जिगळेकर, माधव कोरे, मारोती मेटकर, धम्मदीप भद्रे, माधवराव चिंतले तसेच विविध दैनिक व सोशल मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button