क्राईम

अकलुज येथे दहा लाख घेताना पोलीस हवालदारासह खाजगी इसमाला बेड्या

 

सोलापूर -अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात खासगी इसमांसह पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली असून, १० लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसमाला पकडण्यात आले, तर पुढील पडताळणी कारवाईदरम्यान आणखी दोघांना ५ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करताना रंगेहाथ पकडण्यात आले, अशी माहिती २९ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, ३७ वर्षीय व्यवसायाने लायसन कन्सल्टंट असलेल्या तक्रारदाराने २१ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या भावासह इतर व्यक्तींविरुद्ध अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी लोकसेवक अनिल महादेव शिंदे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या भावाविरुद्ध व इतरांविरुद्ध अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६४/२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी लोकसेवक अनिल शिंदे यांनी खासगी इसम आबा वळकुंदे याच्या मोबाईल फोनद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. तक्रारदाराला यापूर्वी २५ लाख रुपये दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता, तसेच गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी आणि पीसी अँड पीएनडीटी कायद्याच्या कलमांचा गुन्ह्यात समावेश न करण्यासाठीही पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर तक्रारदाराकडून अनिल शिंदे यांच्यासाठी २५ लाख रुपये आणि स्वतःसाठी ५ लाख रुपये, अशी लाच मागणी करण्यात आल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यापैकी १० लाख रुपये लाच स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पुढील पडताळणीत ५.५० लाखांची मागणी २७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पुढील लाच मागणी पडताळणीदरम्यान खासगी इसम आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी वाळके यांच्यासाठी ५ लाख रुपये आणि पोलीस हवालदार वाघ यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

ही रक्कम २८ ऑगस्ट रोजी फोन करून घेऊन येण्यास सांगण्यात आली होती. त्यानंतर लोकसेवक राहुल मारुती वाघ यांनीही अप्रत्यक्षपणे सहभाग दर्शविल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

पाळत ठेवून सापळा; दोघे रंगेहाथ जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे युनिटकडून २८ ऑगस्ट २०२६ रोजी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. या कारवाईदरम्यान आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदाराकडून ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. माळशिरस तालुक्यातील पालखी महामार्गावरील माळशिरस-पिलीव रोडच्या ब्रिजखाली,जानकर प्लॉटजवळ पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता ताब्यात घेण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

१) आबा सावळा वळकुंदे, वय ४८ वर्षे – खासगी वाहन चालक.
२) महादेव पंढरी माने, वय ३९ वर्षे – खासगी इसम.
३) अनिल महादेव शिंदे,पोलीस हवालदार, बकल नं. १६५९.
४) राहुल मारुती वाघ,पोलीस हवालदार, बकल नं. १८१८.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिट यांच्याकडून करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहायक फौजदार राजेश बाटे,पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण तावरे, अश्विन कुमकर,चालक पोलीस हवालदार दगडू सोनावणे व पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांच्या पथकाने कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button