सामाजिक

पुणे येथे आमदार सचिन कल्याणशेट्टीनी हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंतीनिमित्त केले अभिवादन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
पुणे शहरातील मंगळवार पेठ येथे सोमवारी  हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून हुतात्मा श्रीकांत लिंगायत तसेच भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी  विनम्र अभिवादन केले. संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणीविरोधात सत्याग्रह करून १९ महिने तुरुंगवास भोगणारे श्रीकांत लिंगायत हे संघर्षाची आणि देशनिष्ठेची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुण्यातील लष्कर भागातील शिवजयंती उत्सवाचे प्रणेते म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी समाजजीवनात सक्रियपणे कामही केले.
यावेळी ‘हिंदू सारा एक’ या विषयावर मार्गदर्शन करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हिंदू समाजाच्या एकीची आजची गरज अधोरेखित केली. आपल्या समाजातील विविध जाती, पंथ आणि घटकांमध्ये भेद असले तरी आपली संस्कृती, परंपरा आणि मूल्ये आपल्याला एका व्यापक धाग्याने जोडतात. त्यामुळे परस्परांमध्ये सन्मान, बंधुभाव आणि एकोपा वाढवून हिंदू समाजाने एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे. समाजाची एकी मजबूत असेल तरच सामाजिक आव्हानांना सामोरे जाताना आपली सामूहिक ताकद अधिक प्रभावीपणे उभी राहू शकते. हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांनी आपल्या कार्यातून जपलेली राष्ट्रनिष्ठा आणि समाजहिताची भावना आजच्या पिढीने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, कै. श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, विवेक विचार मंच आणि राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्मा श्रीकांत लिंगायत ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप. रावत, प्रांत संघचालक . नानासाहेब जाधव, ट्रस्टचे सचिव . प्यारेलाल चौधरी, माजी मंत्री . दिलीप कांबळे, . दीपक नागपुरे, . चंद्रकांत लिंगायत, . दिनेश होले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button