सामाजिक

एक दिवस नक्की माय, साहेब होऊन येईल

स्पर्धा परीक्षा वेदना.....

 

वावरात मोकळा फिरणारा
खुराड्यात पेईंग गेस्ट राहतो
हुरडा कणीस खाणारा
वडापाव वर राहतो
नरिमन पॉईंटला, राहील माय
आजचा दिवस जाईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल

शेतीत काही पिकत नाही
पिकलं तरी विकत नाही
मातीमध्ये कर्ज सोडून
दुसरं काही उगवत नाही..
कर्जाच्या हप्त्याला मी
पगार बांधून देईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल

ताई तू रडू नको
यंदाचा मुहूर्त जाणार नाही
बघितलेले स्थळ आपण
हातचे जाऊ देणार नाही
इंटरव्ह्यूचा कॉल होताच
बस्ता बांधायला येईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल

दादू कॉलेज सोडू नको
थकलेली फी भरून टाकू
तुझा भाऊ साहेब होतोय
नको कुणापुढे वाकू
हवे तिथे ऍडमिशन
तुला घेऊन देईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल

शेतात राबून स्वप्न बघत
बापू लटकून गेले
तुझ्या माझ्या आयुष्याला
ओसाड दिवस आले
इंटरव्ह्यू फक्त होऊ दे
आयुष्याला हिरवाई येईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल
________________________
फुटले जरी पेपर तरी
अजून तग धरली आहे
आयुष्याची वर्षे सरली
आता उमेद हरली आहे
कसा येऊ गावाकडे
नजरेला नजर देऊ?
किती दिवस तेच सांगून
वेळ मारून नेऊ ?
वाट बघू नको सणाला
लायब्ररीत दिवाळी होईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल

माहीत आहे मला माय
तुम्ही कसे जगता रोज
भविष्याच्या आशेवर
आता दिवस फक्त मोज

हॉटेलात वेटर म्हणून जातो
कठीण काळ आलाय
विचारले कुणी तर सांगत राहा
साहेब व्हायला गेलाय…
एज बार झाल्यावरच
नाद सोडून देईल
एक दिवस नक्की माय
साहेब होऊन येईल

हेरंब कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button