सांस्कृतिक

अभिनेते रविंद्र महाजनी

सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या सदाबहार अभिनयाने मराठी चित्रपटांचा प्रवाह बदलायला लावणे अभिनेते रविंद्र महाजनी यांचा आज दि. ७ ऑक्टोबर जन्मदिवस. त्यांच्या रुबाबदार व्यकिमत्व आणि स्टाईलमुळे त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना म्हटले जायचे.
रवींद्र महाजनी यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९४९ साली बेळगावचा. रवींद्र दोन वर्षांचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला. रवींद्र महाजनी यांचे वडील ह. रा. महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. एका प्रथितयश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते. वडिलांची शिकवण रवींद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली. वडील त्यांना म्हणायचे, “तू कुठलंही काम कर. पण, प्रामाणिकपणे कर. त्या कामाशी बेईमानी करू नकोस. बघ, यश तुझंच आहे.” हेच त्यांचे वाक्य लक्षात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत सुरू केली. शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांना अभिनयाची अतिशय आवड. मोठे झाल्यानंतर नाटकांत-चित्रपटांतच जायचे, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते.
शाळेतही ते स्नेहसंमेलनात, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत. इंटर सायन्सच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर अशी मंडळी होती. सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड. शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे, असे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते. त्यावेळी ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे. अशोक मेहताही त्यांच्यासोबत असायचे. चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे, हेही त्याचवेळी त्यांचे ठरून गेले होते. शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड होती. रमेश तलवार-अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती. रॉबिन भट्ट यांना लेखनाची आवड होती, तर अशोक मेहता यांना कॅमेरामन व्हायचे होते. आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात स्थिरावले आणि यशस्वी झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती, त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते. अभिनय करणं आणि पैसे कमावणे यातून त्यांनी सुवर्णमध्य काढला. दिवसा निर्मात्यांना भेटता यावे, म्हणून रात्री टॅक्सी चालवायची, हे ठरवले. रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा आपले अभिनयाचे वेड जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला. तब्बल तीन वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. त्याच्या अनेक नातेवाइकांनी ‘लोकसत्ता’च्या संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून बरीच टीका केली, त्यांच्याशी बोलणेही सोडले, पण रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहीत होते.
मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षांचा संघर्ष संपवला. ‘झुंज’ने रौप्यमहोत्सवी यश मिळवले आणि महाजनींकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या खात्यावर जमा झाले. ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे विनोदी ढंगाचे हलकेफुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांनाही यश मिळाले. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्‍वभूमीच्या चित्रपटांची चलती होती. तरीही महाजनींसारखा ‘तारा’ मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील, अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटांतील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला. चांगली कथा-पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचे देखणे रूप, हे समीकरण १९७५ ते १९९० या काळात छान जुळून आले होते. १९८४ मध्ये अभिनेते अरुण सरनाईक यांच्या आकस्मिक निधनानंतर रविंद्र महाजनींनी त्यांच्या ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे अनेक प्रयोग केले.
हिंदीतदेखील ‘बढ़कर’, ‘गंगा किनारे’, ‘नैन मिले चैन कहाँ’, ‘कानून कानून हैं’, ‘वहम’ आणि ‘गूंज’ हे चित्रपट त्यांनी केले परंतु, त्यात त्यांना तितके यश मिळाले नाही. त्यांनी ‘सत्ताधीश’ नावाचा चित्रपटदेखील निर्माण केला. परंतु, तो फारसा चालला नाही. सन १९९० नंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी ‘काय राव तुम्ही’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, अशा काही चित्रपटांतूनही भूमिका केल्या. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनीदेखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून, तेसुद्धा वडिलांच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत. ‘पानिपत’ व ‘देऊळ बंद’ या दोन चित्रपटांमध्ये या बापलेकांनी सोबत अभिनय केला आहे. ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अति महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणार्‍या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. या चित्रपटात त्यांनी मल्हारराव होळकरांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
मराठी चित्रपटांमध्ये एक काळ गाजविणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणारे त्या काळचे ‘हॅण्डसम हंक’ हरहुन्नरी कलावंत, म्हणजेच दिलखुलास अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने, ते मावळ तालुक्यातील आंबी या गावी एक्झर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. दि.१४ जुलै २०२३ ला सायंकाळी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button