पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

सदाबहार संगीतकार, भावगंधर्व म्हणून नावाजले गेलेले पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा दि. 26 ऑक्टोबर वाढदिवस.
त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे ‘भावगंधर्व’ अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत.
१९५५ पासून आपल्या संगीतविेशाची कारकीर्द सुरू करणार्या हृदयनाथांनी आपले वडील मा. दीनानाथ मंगेशकर यांचा थोर वारसा जतन करीत आपली वाटचाल सुरू केली. सुरुवातीला या वाटचालीत प्रचंड कष्ट आणि भरपूर अडथळे होते. परंतु अत्यंत परिश्रम आणि चिकाटीने मेहनत घेऊन त्यांनी या क्षेत्रात भरपूर नावलौकिक मिळवला. लता, आशा, उषा यांच्याही संगीताची वाटचाल त्यांनी खूप जवळून अनुभवली. परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रधर्म यांची शिस्त पाळून त्यांनी अभिजात संगीताचा दर्जा कायम टिकवला. अनेक कवींच्या गाण्यांना त्यांनी सुंदर चाली दिल्या. प्रत्येक गाणे, गाण्यातील काव्यरचना आणि त्यांतील विचार आशयासहित त्यांनी गानरसिकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. अनेक गाण्यांची लयकारी, ते गाणे आणि त्याची निर्मिती होण्यापूर्वीच्या त्याच्या अनेक बारीकसारीक गोष्टींची त्यांना अगदी तंतोतंत आणि सुरस अशी माहिती असते.गाणे उमलण्यापूर्वी त्यातील प्रतिभेच्या स्पर्शाची त्यांना सर्वांगाने जाणीव होते. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संगीतांतील सूरांच्या प्रतिभेचा स्पर्श ते आपल्या अनवट गाण्यांमधून समर्थपणे आविष्कृत करतात. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या ज्ञानेेशरांच्या अनेक रचना लता मंगेशकर यांनी गायल्या आहेत. सुरेश भट , आरती प्रभू, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक गीतांना हृदयनाथांनी भावपूर्ण चाली लावल्या आहेत. हृदयनाथांच्या अनेक चालींवर हिंदुस्थानी अभिजात संगीताची मोठी छाप आहे. मराठी जनमानसाच्या ओठावर रुळलेली आणि प्रतिभेच्या स्पर्शाने संस्कारीत झालेली त्यांची असंख्य गाणी आठवणींच्या हिंदोळ्यावर नेहमीच आपल्या मनाला परमानंद देत राहतात. उदा. ‘मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो….’ ‘त्या फुलांच्या गंधकोषी…’ ,‘गेले ते दिन गेले’ हे त्यांचे भावगीत, तसेच ‘गजानना श्री गणराया…’श्यामच्या आईतील ‘छडी लागे छम छम’, ‘नको देवराया अंत असा पाहू’, ‘अशी धरा असे गगन’, ‘का चिंता करसी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘या रे या सुजन’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’,‘ गोड गोजिरी, लाज लाजरी ताईच होणार नवरी’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ अशी त्यांची कितीतरी गाणी आपल्या ओठांवर रुळतात. ती त्यांनी दिलेल्या अभिजात संगीतामुळे. गीतेतले अनेक श्लोकसुद्धा त्यांनी संगीतबद्ध केले आहेत. गाणे गाताना आणि ते गाणे रसिकांच्या मनात शब्दांच्या सामर्थ्यपूर्ण आशयाने सुगंधित करताना पं. हृदयनाथ दिवंगत प्राचार्य राम शेवाळकर यांच्याकडून अधूनमधून काही शब्दांची किंवा अडलेल्या संदर्भाची नेहमीच माहिती करून घेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनीच मराठीत खर्या अर्थाने अजरामर केल्या. हृदयनाथांच्या संगीतात राष्ट्रभक्तीची मोठी जादू आहे. संतसज्जनांचा वारसा त्यांच्या गाण्यातून भावपूर्णरीत्या आनंदाच्या परिमळासारखा झिरपतो. त्यामुळेच पंडित हृदयनाथ हे महाराष्ट्राचे खर्या अर्थाने भावगंधर्व ठरले आहेत.




