सत्तेत बसून मोर्चे काढणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा हास्यास्पद – खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर – सत्तेत असताना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि स्वतःच मोर्चे काढून लोकशाही वाचवण्याच्या घोषणा द्यायच्या, हा भाजप सरकारचा दुटप्पीपणा असून सत्ताही यांची, मोर्चाही यांचाच, मग जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लबाड लांडगा ढोंग करतो आणि लोकशाही वाचवण्याचे सोंग घेतो, अशी भाजप सरकारची अवस्था झाली आहे. सत्तेत बसून मोर्चे काढणे हास्यास्पद आहे. जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेले सरकार आता संविधान वाचवा, अराजकता हटवा, अशा घोषणा देत आहे. वास्तविक पाहता त्यांच्या बॅनरवर ‘आमचं सरकार वाचवा’ असा नारा असायला हवा. भाजपच्या या राजकारणाला जनता कंटाळली असून आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
निवडणुकीपूर्वी सोलापूर शहराला रोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारला आज नियोजनाअभावी आठवड्यातून जेमतेम एक दिवस पाणीपुरवठा करता येत आहे. महागाईने उच्चांक गाठला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित मदत मिळालेली नाही. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ घोषणा आणि प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांवर वर्षाकाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा गाजावाजा केला जातो; मात्र दुसरीकडे गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यसेवांबाबत सरकारची उदासीनता दिसून येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या महा लॅब, मोफत डायलिसिस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या महत्त्वाच्या आरोग्यसेवा निधीअभावी संकटात सापडल्या आहेत.
‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ या कंपनीची तब्बल १,०६७.२७ कोटी रुपयांची देयके सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रलंबित असल्याने १ नोव्हेंबरपासून राज्यातील अनेक भागांत महा लॅब, आपला दवाखाना आणि डायलिसिस केंद्रांच्या सेवा बंद पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे हजारो गरीब रुग्णांच्या मोफत आरोग्य सुविधांवर गदा आली आहे. एका बाजूला योजनांचा गाजावाजा आणि दुसऱ्या बाजूला आरोग्यसेवांसाठी निधी नसणे, हा सरकारचा कारभार आहे, असे त्या म्हणाल्या.
देशातील सरकारी कंपन्या आणि बँकांसारख्या सार्वजनिक मालमत्तांचे खासगीकरण आणि विक्री केल्यानंतर आता भाजप सरकारची नजर देशाच्या नैसर्गिक संसाधनांवर आहे. विकासाच्या नावाखाली भाजपशासित राज्यांसह देशभरात निसर्गाची बेछूट कत्तल सुरू आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पाबाबतही सरकार सोलापूरकरांना अपुरी माहिती देऊन दिशाभूल करत आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकरी, मासेमार आणि अनेक गावांतील नागरिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषणामुळे पर्यावरण व वन्यजीवांवरही दुष्परिणाम होऊ शकतात. या सर्व बाबींची पुरेशी माहिती न देता हा प्रकल्प जनतेवर लादण्याचा सरकारचा अट्टाहास सुरू आहे. जनतेला पाणी, शेतकऱ्यांना सिंचन आणि स्थानिकांना रोजगार व सुविधा देण्याऐवजी त्यांच्या हक्काच्या नैसर्गिक संसाधनांवर डल्ला मारण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जंतरमंतरवर तरुण विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेट गन वापरण्याचे आदेश देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संविधान वाचवण्यासाठी मोर्चे काढत आहेत, यापेक्षा भिकार राजकारण काय असू शकते? मणिपूरच्या प्रश्नावर भाजप गप्प आहे, अरुणाचल प्रदेशच्या सीमावादावर गप्प आहे. एसआयआर प्रक्रियेद्वारे किती बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर काढले, याचे उत्तरही भाजपकडे नाही. स्वतःच्या कारभारातील अपयश झाकण्यासाठी भाजपकडून अशा घोषणा आणि राजकीय दिखावा केला जात आहे, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
अमित शाह लोकशाही वाचवण्याच्या आणि २०२९ चे आव्हान देण्याच्या बाता करतात. हिंमत असेल तर सरकार बरखास्त करा, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. उद्याही निवडणूक घेतली तरी आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. तरुणाईमध्ये अस्वस्थता आणि खदखद आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजप सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच जनतेच्या खऱ्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण केले जात आहे. मात्र जनता आता भाजपच्या भंपक घोषणांना बळी पडणार नाही. लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचा डर चांगला आहे, असा टोलाही खासदार प्रणिती शिंदे यांनी लगावला.
‘लोकतंत्र जिंदा रहने के लिए… ये डर अच्छा है!’ असे म्हणत त्यांनी भाजप सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार निशाणा साधला.
या पत्रकार परिषदेला सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, नगरसेवक नरसिंह आसादे, मुस्तफा बळोरगी, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.



