मनोरंजन

सुपरस्टार शाहरुख खान

हिंदी चित्रपटसृष्टीत बॉलिवूड का बादशहा, किंग ऑफ बॉलिवूड, किंग खान या उपाधिंनी ओळखला जाणारा, हजारो तरुणींच्या गळयातील ताईत असणारा, रोमांस, ड्रामा, कॉमेडी, अ‍ॅक्शन या सर्व प्रकारांना लिलया हाताळणारा सुपरस्टार शाहरुख खान याचा आज दि. 2 नोव्हेंबर वाढदिवस.
शाहरुख खान जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेता असून, आजवर 30 वेळा फिल्मफेअरकरिता त्याचे नामांकन झाले आहे. त्यापैकी 14 वेळा त्याला हा पुरस्कार मिळाला आहे त्यात 8 वेळा तो सर्वश्रेष्ठ अभिनेता ठरला आहे. 8 फिल्मफेअर मिळवून तो दिलीपकुमार यांच्यासोबत सर्वाधिक 8 फिल्मफेअर मिळणारा कलावंत ठरला आहे.
शाहरुख खान याचा जन्म दिल्ली 2 नोव्हेंबर 1965 ला झाला. वडीलांचे नाव मीर ताज मोहम्मद खान असून, ते पेशावर येथील मूळ राहिवासी आहेत. आईचे नाव लतीफ फातिमा त्या हैद्राबादच्या मूळ राहिवासी आहेत. शाहरुखला एक मोठी बहीण आहे शहनाज लालारुख ही सध्या त्याच्यासोबतच मुंबईत राहते. शाहरुखचे वडील पठाणी तर आई हैद्राबादी आहे. शाहरुखने प्राथमिक शिक्षण सेंट कोलंबस स्कूल दिल्ली येथे घेतले. पदवीकरिता त्याने हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ जास्त करून दिल्ली थिएटर ग्रुपमध्येच घालवला. दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्याकडून त्याने अभिनयाचे धडे घेतले. जेमतेम पदवी झाल्यानंतर जनसंवाद विषयात पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी जामिया मिलिया इस्लामिया इथे प्रवेश घेतला पण अभिनयात करियर करण्याचे ठरल्याने, हे शिक्षण अर्धवट सोडले.
शाहरुखची कारकिर्द टेलिव्हिजनपासून सुरु झाली. दिल दरिया, दुसरा केवल, फौजी, सर्कस या मालिकांमध्ये त्याने अभिनेता म्हणून ओळख मिळविली. त्याने मणि कौल दिग्दर्शित ‘इडियट’ (१९९२) या दूरचित्रवाणी लघुपटामध्ये आणि अरुंधती रॉय लिखित प्रदीप क्रिशन यांचा दूरचित्रवाणीवरील चित्रपट ‘इन विच एनी गिव्झ इट दोज वन्स’ (१९८९) मध्येही अभिनय केला आहे.
चित्रपटातील कारकिर्द सुरु झाली ती दिवाना (१९९२) या चित्रपटापासून. त्याने हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है “आणि त्यानंतर राज कंवर दिग्दर्शित’ दीवाना” या चित्रपटासाठी करार केला होता. ‘दीवाना “हा चित्रपट प्रथम पडद्यावर आला. दिवाना या चित्रपटाकरिता त्याला सर्वश्रेष्ठ नवोदित अभिनेत्याचा फिल्मफेअरही मिळाला होता. त्याकाळात पहिलाच चित्रपट सुपरहिट होवून शाहरुख चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाला. या यशानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि यशस्वीतेच्या एकेक पायर्‍या चढत आज तो या स्थानावर पोहचला आहे.
त्यानंतर ‘डर’ मधील वेडसर असणाऱ्या प्रेमीपासून ते ‘बाजीगर’ मधील आकर्षक खलनायक धाटणीच्या नायकापर्यंत शाहरुखने धाडसीपणे वैविध्यपूर्ण भूमिकांची निवड केली. पुढे त्याने ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘माया मेमसाब’, ‘कभी हां कभी ना’ आणि ‘अंजाम’ या चित्रपटांमध्ये भूमिकांमध्ये प्रयोग केले. ९० च्या दशकाच्या मध्यात शाहरुख खानने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे “या चित्रपटात नायक साकारला. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रणयाची व्याख्या बदलवणाऱ्या या चित्रपटानंतर त्याला रोमान्सचा राजा ही पदवी मिळवून दिली. अनिवासी भारतीय राजची त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली. हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता.
उत्कट आणि संवेदनशील भूमिकांनी शाहरुखने लोकांची मने जिंकली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे “,’ दिल तो पागल है”, ‘कुछ कुछ होता है “,’ देवदास”, ‘कल हो ना हो “आणि’ माय नेम इज खान” हे चित्रपट त्याच्या भूमिकांचे वैविध्य दाखवतात. यासोबत ‘बाजीगर’ आणि ‘डर’ या थरारपटांमधील, ‘कभी खुशी कभी गम’ यातील कौटुंबिक, ‘मोहब्बतें’ आणि ‘वीर जारा’ या चित्रपटातील प्रेमी, ‘येस बॉस’, ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांमधील विनोदी तसेच ‘डॉन’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या अॅक्शन चित्रपटांमध्ये अभिनय साकारुन त्याने आपल्या अभिनयाची अष्टपैलू प्रतिभा दाखवली आहे. यासोबतच ‘स्वदेश’, ‘पहेली’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘चक दे इंडिया, करण अर्जुन, चाहत, कोयला, परदेस, जोश, देवदास, रब ने बना दी जोडी, रा वन, जब तक है जान, हॅपी न्यू इयर, फॅन, बिल्लू बार्बर, फॅन, ऐ दिल है मुश्किल, रईस आणि डंकी यांचाही उल्लेख आवर्जुन करावा लागेल.
शाहरुख खान हा अभिनयासोबत यशस्वी निर्माता आणि उद्योजक आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटचा सहसंस्थापक अध्यक्ष असून, आयपीएल क्रिकेट संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. त्याच्या व्यावसायिक कौशल्याने त्याने ‘ब्रँड एस. आर. के.’ हे स्थान मिळवले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाकरिता त्याला भारत सरकारने पद्मश्री देवून तर फ्रांस सरकारने ओरड्रे डेस आर्टस् एट डेस लेट्रेस आणि त्यांचा सर्वोच्च नागरिक सन्मान लीजन डी ऑनर या पुरस्कारांनी गौरविलेले आहे. शाहरुख खानच्या सर्वात उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे मीर फाउंडेशन, आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू करण्यात या फाऊंडेशनला त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांचे नाव दिले आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना मदत करणारी ही संस्था त्यांना कायदेशीर सहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन पुरवण्यासाठी अथक परिश्रम घेते. या फाउंडेशनचा ‘टू गेदर ट्रान्सफॉर्म्ड’ उपक्रम हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे, अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी सुधारात्मक शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्यात येते. तसेच कर्करोगाच्या रुग्णांना मदत करम्यातही तो आघाडीवर असतो. आयपीएल ७ ची संपूर्ण १५ कोटी बक्षीस रक्कम त्याने दान केली होती.
शिवाय, शाहरुख खान गरीब आणि गरजू लोकांना आणि अनाथ मुलांना मदत करणाऱ्या १० हून अधिक स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत असतो. बाल लसीकरणाला चालना देण्यासाठी २००५ मध्ये युनिसेफ आणि भारताच्या आरोग्य मंत्रालयासोबत त्याने काम केले होते.
वैयक्तिक आयुष्यात गौरी छिब्बरला भेटल्याने त्याच्या जीवनप्रवासाला प्रणयरम्य वळण मिळाले. कुटुंबियांचा विरोध असतांनाही, १९९१ मध्ये त्यांनी विवाह केला. शाहरुख आणि गौरी यांचे आर्यन, सुहाना आणि अबराम या तीन अपत्यांसह कुटुंब आहे. त्याचे चाहते प्रत्येक वयोगटातील आहेत. खासकरून मुलींच्या गळ्यातील तो ताईत आहे. पण असे असतांनाही त्याच्या संपूर्ण करियरमध्ये त्याच्याविषयी गॉसिप ऐकायला मिळाले नाहीत की, एखाद्या अभिनेत्रीबरोबर त्याचे नाव जोडले गेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button