विश्वकर्मा सुतार समाजावर उपासमारीची वेळ; प्रत्येकी ५० हजारांच्या आर्थिक मदतीची भाई मुंजा पांचाळ यांची मागणी

दुष्काळीने व्यापारी वर्ग परेशान होत आहे प्रशासनाने उपायोजना करणे गरजेचे
माजलगाव ( नाजेर कुरेशी )
दुष्काळ आणि आधुनिकतेच्या लाटेत लोखंडी अवजारांचा वाढलेला वापर यामुळे पारंपरिक लाकडी व्यवसायावर अवलंबून असलेल्या विश्वकर्मा सुतार समाजावर भीषण उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती गंभीर असून, आत्महत्यांचे पाऊल उचलण्याची वेळ येण्यापूर्वी राज्य सरकारने दखल घेत महाराष्ट्रातील प्रत्येक सुतार कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी, अशी आक्रमक मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजलगाव तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ यांनी केली आहे.सुतार समाजाचे कुटुंब पिढ्यानुपढ्या लाकडी अवजारे (उदा. आऊत, तिफन, मोगडा, बैलगाडी, जु), घरांचे दरवाजे आणि चौकटी बनवण्याच्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून होते. शेतीमध्ये आणि इतर कामांसाठी लोखंडी अवजारांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यामुळे लाकडी अवजारांची मागणी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.तीव्र आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबासमोर मुलींच्या लग्नासारखे मोठे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आवासून उभे ठाकले आहेत.
आर्थिक विवंचनेमुळे राज्यातील सुतार समाजातील कोणत्याही बांधवाने टोकाचे पाऊल (आत्महत्या) उचलू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन भाई मुंजा पांचाळ यांनी केले आहे.



