सोलापूर

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सोलंकरवाडीत शेतकरी-ग्रामस्थांचे आंदोलन

 

शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि, भवितव्याचा विचार करून शासनाने महामार्गाबाबत फेरविचार करावा: आंदोलकांची मागणी

माढा (प्रतिनिधी) माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी व, ग्रामस्थ यांच्यावतीने काल रोजी मोठे आंदोलन करण्यात आले. सदरील प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतीचे क्षेत्र, उपजीविका तसेच; भविष्यातील आर्थिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी ह्या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी हेच त्यांच्या उपजीविकेचे एक प्रमुख साधन असून त्याच जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही विचार न करता केवळ विकासाच्या नावाखाली महामार्ग लादणे योग्य नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.

पवनार ते पत्रादेवी ह्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबत शासनाने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या भावना, त्यांच्या जमिनींचे होणारे नुकसान, शेतीवरील परिणाम आणि, पर्यायी मार्गांची शक्यता यांचा सखोल विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यास सदरचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. “आमचा विकासाला विरोध नाही; मात्र, शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा विकास आम्हाला मान्य नाही” अशी स्पष्ट भूमिका सोलंकरवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली.

शेतकऱ्यांच्या भावना आणि, त्यांच्या न्याय्य मागण्यांचा आदर राखून शासनाने शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाचा फेरविचार करून शेतकरी-नागरिक हिताचा निर्णय घ्यावा हीच माफक अपेक्षा असल्याचे याप्रसंगी आंदोलकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button