सोलापूर

दुष्काळ, पाणीटंचाई आणि, प्रशासकीय गैरप्रकारांविरोधात दिला माढ्यात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा

नागरिकांच्या प्रशासनाकडे मागण्या: मनकर्णा नदीला पाणी सोडा; पाण्याच्या टँकर्सला GPS बसवा, चारा छावण्यांत बायोमेट्रिक सिस्टीमची व्यवस्था करा

माढा (प्रतिनिधी) माढा तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती व, पाणीटंचाई तसेच; विविध शासकीय कार्यालयांतील कथित अनियमितता आणि, नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माढा शहरातील अनेक नागरिकांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्त तसेच, संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

माढा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक आणि शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच; शेतीसाठी पाण्याची गंभीर समस्या भेडसावण्याची शक्यता असल्याचे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. उजनी धरण माढा तालुक्यात असूनही मनकर्णा नदीला पाणी मिळत नसल्याने तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी प्रमुख मागणी प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली आहे.

पाण्याच्या टँकर्सवर GPS सिस्टीम अनिवार्य करण्याची मागणी

पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने प्रत्येक पाणी टँकरवर GPS यंत्रणा बसवून पारदर्शक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करावी अशी मागणीही इथे करण्यात आलेली आहे. तसेच, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झाल्यास तेथेही बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून गैरप्रकारांना आळा घालावा अशीही मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची मागणी

माढा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करावी आणि, संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या कामांसाठी कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचारी यांनी नियमितपणे उपलब्ध राहणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.

भूमिअभिलेख कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी करा

सदरील निवेदनात माढा व, कुर्डूवाडी येथील भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयातील काही अधिकारी-कर्मचारी व बाहेरील व्यक्तींच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप करण्यात आले असून ह्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.

नागरिकांकडून विविध कामांसाठी अतिरिक्त रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच; कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पावतीशिवाय कोणतेही शुल्क स्वीकारू नये, अनधिकृत मध्यस्थांना कार्यालयातून दूर करावे आणि, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी अशीसुद्धा मागणी करण्यात आली आहे.

कुर्डूवाडी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबतही तक्रारी करण्यात आल्या असून संबंधित कर्मचारी आणि, कथित मध्यस्थांच्या भूमिकेची प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळू नका’

“माढा तालुक्यातील शेतकरी आणि, नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. उजनीचे पाणी जवळ असूनही मनकर्णा नदीला पाणी मिळत नसेल तर, ही गंभीर बाब आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत बळीराजाला मदतीची गरज असताना प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रशासनाने अशा सर्व मागण्यांची तातडीने दखल घेवून पाणी, चारा, शेतकरी मदत आणि, शासकीय कार्यालयांतील पारदर्शकतेबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा; नागरिकांच्या वतीने लाक्षणिक उपोषणासह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा इथे देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button