सोलापूर

ठिय्या आंदोलनानंतर महावितरण नमले; जखमी वीज कर्मचाऱ्यास ESIC नियमानुसार आर्थिक मदतीचे आश्वासन

 

सज्जन पवार यांच्या उपचारासाठी मदतीची मागणी; आंदोलनाची दखल घेत महावितरणकडून कार्यवाहीचे लेखी आश्वासन

माढा (प्रतिनिधी) उपळाई (बुद्रुक) गावातील ११ केव्ही वीजवाहिनीवर काम करताना गंभीर अपघात झालेल्या बाह्यस्रोत कर्मचारी सज्जन पोपट पवार यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी ह्या मागणीसाठी माढा येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाची महावितरण प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली आहे. आंदोलनानंतर महावितरणच्या माढा उपविभागाने एक लेखी पत्र देत संबंधित कर्मचाऱ्याची ESIC व, PF संदर्भातील नोंदणी संबंधित एजन्सीने केलेली असून ESIC नियमानुसार आर्थिक मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, नियमानुसार कार्यवाही करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासनही दिलेले आहे.

सज्जन पोपट पवार हे माढा ग्रामीण परिसरात बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असून वीजवाहिनीवरील काम करीत असताना गंभीर अपघात झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सदरील दुर्घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पुढील उपचाराबाबत कुटुंबीयांकडून मोठी चिंता व्यक्त करण्यात आलेली होती.

अपघातानंतर उपचारासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असताना महावितरण प्रशासनाकडून तातडीने अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोप करत ‘शंभू साठे मित्र परिवार’ तसेच, संबंधित नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे रीतसर निवेदन दिले होते. त्यानंतर मागण्यांची तातडीने दखल घ्यावी यासाठी माढा महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर महावितरण कंपनीचे लेखी पत्र

सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या माढा उपविभागीय कार्यालयाने ‘शंभू साठे व, इतर’ यांना लेखी पत्र दिले आहे. संदर्भीय पत्रात सज्जन पोपट पवार हे बाह्यस्रोत कर्मचारी असून त्यांचा ESIC व, PF संबंधित एजन्सीने जनरेट केलेला असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच, ESIC यांच्या नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्याला आर्थिक मदत मिळणार असून त्यासाठी नियमानुसार कार्यवाही करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल असे महावितरणने पत्राद्वारे इथे स्पष्ट केले आहे.

महावितरणने आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत संबंधित आंदोलन स्थगित करून पुढील कार्यवाही होईपर्यंत थांबण्याची नम्र विनंती केलेली आहे.

“कर्मचाऱ्याच्या जीविताचा प्रश्न; केवळ कागदी आश्वासन नको” -दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनाचे स्वागत केले असले तरी मदत प्रत्यक्षात मिळेपर्यंत ह्या प्रकरणावर लक्ष ठेवणार असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. गंभीर जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असून केवळ नियम आणि, प्रक्रियेचा उल्लेख करून विलंब होऊ नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

धोकादायक वीजकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अपघातानंतर त्याच्या उपचाराची जबाबदारी आणि, कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, ESIC अंतर्गत मिळणारी मदत तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक त्या इतर मदतीबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

अपघाताची चौकशी व, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी -सज्जन पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करून अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला व, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या का तसेच; संबंधित कर्मचाऱ्याला सुरक्षिततेची साधने व, मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते का याचीही चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जखमी कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी आर्थिक मदत, ESIC अंतर्गत मिळणारे सर्व लाभ आणि, कुटुंबाला आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी सदर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर महावितरणने लेखी आश्वासन दिल्याने प्रशासनावर आता हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, महावितरणच्या लेखी पत्रामुळे मदतीचा मार्ग खुला झाला असला तरी, मदत प्रत्यक्ष मिळेपर्यंत प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनप्रसंगी शंभू साठे, हरी बेडगे, इसाक काझी, बाळासाहेब पाटील, भारत खंडागळे, दत्तात्रय सावंत, वैभव गोरे, अक्षय विद्यागर, जमीर सय्यद, आण्णासाहेब खंडागळे, सचिन खैरे-पाटील, गंगाराम शिंदे, एकनाथ वाकडे, दत्तात्रय जाधव, सुभाष डुचाळ, बाळू बोंद्रे, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button