पिण्याच्या पाण्यासाठी वेताळवाडी ग्रामस्थांचा एल्गार

रास्ता रोको करून व्यक्त केला प्रशासनाविरोधात संताप
माढा (प्रतिनिधी) माढा तालुक्याच्या वेताळवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी येथील संतप्त ग्रामस्थांनी मोहोळ-करमाळा राज्य महामार्गावर आज रोजी रास्ता रोको आंदोलन छेडले. पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
सिना-माढा उपसा सिंचन योजनेअंतर्गत सिंचनासाठी पाणी सोडले जात असताना वेताळवाडी गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीलगत असलेल्या पाझर तलावामध्येही पाणी सोडण्यात यावे अशी याठिकाणच्या समस्त ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.
याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाकडे निवेदन देवूनही प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांमध्ये खूपच नाराजी होती. त्यामुळे, ग्रामस्थांनी अखेर थेट राज्य महामार्गावर ठिय्या देत आज मोठे रास्ता रोको आंदोलन केले.
“सिंचनासाठी पाणी मिळते. मग, गावकऱ्यांच्या कोरड्या घशाला पाणी का मिळत नाही?”
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पिण्याचे पाणी हा मूलभूत अधिकार आहे. कागदावर आदेश काढून उपयोग नाही; गावातील विहिरी आणि, पाझर तलावात प्रत्यक्ष पाणी पोहोचले पाहिजे” अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, संबंधित पाझर तलावासाठी पाणी सोडण्याबाबत दि. ३० सप्टेंबर, २०२६ रोजी आदेश काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सदरील आदेश फक्त कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होवून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा इशारा वेताळवाडी ग्रामस्थांनी दिला.
रास्ता रोकोमुळे माढा-कुर्डूवाडी मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. संबंधित प्रशासन व, पोलीस यंत्रणेने आंदोलनस्थळी दाखल होत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांच्या ह्या आंदोलनामुळे वेताळवाडीचा पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आता प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून हा प्रश्न कितपत सोडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“पाणी मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.



