धार्मिक

गौडगाव येथील श्री जागृत मारुती   दर्शनासाठी श्रावणी शनिवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी !

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 गौडगाव ता अक्कलकोट येथील हेमाडपंथी श्री जागृत मारुती मंदिर व अन्नछत्र मंडळात श्रावणी शनिवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र शनिवार असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू होती. दिवसभर महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून आलेल्या भाविकांचा ओघ कायम राहिला. ‘श्री जागृत मारुती’च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
श्रावण महिना हा अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मानला जातो. या  निमित्ताने मंदिरात व्रतवैकल्य धार्मिक विधी भक्तीमय वातावरण पार पडले  पहाटेपासून मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मारुतीचे दर्शन घेतले, पूजा-अर्चा केली तसेच नवसपूर्तीच्या निमित्ताने मंदिरात सेवा व योगदान दिले. मंदिर परिसरात ‘जय हनुमान’, ‘श्री मारुतीराया’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था –
दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही भाविकाला महाप्रसादापासून वंचित राहु लागू नये, यासाठी श्री जागृत मारुती अन्नछत्र मंडळाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. 
दरम्यान तुळजापूर येथील जागृत हनुमानचे निस्सिम भक्त सचिन बनसोडे यांच्या वतीने श्रावण मांसानिमित्त भाविकांना महाप्रसाद देण्यात आले.
सध्या पवित्र श्रावणमांस सुरु असून दर शनिवर, मंगळवार, सोमवार या दिवशी मंदिर समितीच्या वतीने विधिवत होम हवन अभिषेक करण्यात येते . भाविकांची श्रावण मांसात दर्शनासाठी गर्दी होत असल्यामुळे मंदिर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त तसेच अन्नछत्र मंडळातील सेवेकरी यांनी सुक्ष्म नियोजन केले आहे.
आज श्रावणी शनिवार निमित्त मंदिर समिती व सेवेकरी दिवसभर भाविकांच्या सेवेत तत्पर होते. दूरवरून आलेल्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले.
श्रावणी शनिवार निमित्त दिवसभर हजारो भाविकांनी अन्नछत्रातील महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर भाविकांनी अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
श्रावणी शनिवारच्या निमित्ताने दुपारच्या आरतीचा मान रविचंद्र अंबाजी शिवपुरम यांना मिळाला. धार्मिक विधी आणि आरतीच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आरतीनंतर भाविकांनी मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.
श्रावणमासात श्रावणी शनिवार निमित सोलापूर येथील शिवशंभो रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील तरुण व भाविकांनी रक्तदान करून पवित्र अशा रक्तदान सेवेत सहभाग नोंदवला.
गौडगाव येथील श्री जागृत मारुती हनुमान हेमाडपंथी मंदिर हे अतिशय प्राचीन व श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखले जाते. सलग ११ शनिवार आणि मंगळवारी श्री मारुतीचे दर्शन घेतल्यास मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, अशी भाविकांची जुनी व दृढ श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक नियमितपणे गौडगाव येथे दर्शनासाठी येत असतात.
विशेषतः श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक कुटुंबे, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक श्रद्धेने मारुतीरायाच्या दर्शनासाठी गौडगावला येतात. काही भाविक नवसपूर्तीसाठी तर काही जण आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, या श्रद्धेने सलग शनिवार व मंगळवार दर्शनाची सेवा करतात.
दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी श्री जागृत मारुती अन्नछत्र मंडळाचे कार्य महत्त्वाचे ठरत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भरपेट महाप्रसाद देण्याची परंपरा अन्नछत्र मंडळाने जपली आहे. कोणताही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नछत्रात प्रसाद दिला जातो. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र हे केवळ भोजनाचे ठिकाण न राहता सेवाभाव, श्रद्धा आणि माणुसकीचा संगम ठरले आहे.
अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर किंवा नवसपूर्तीनंतर आपल्या कुवतीनुसार अन्नछत्र मंडळाला अन्नदान, आर्थिक मदत किंवा इतर स्वरूपात योगदान देतात. भाविकांच्या या सहकार्यामुळे अन्नछत्र मंडळाचे सेवाकार्य सातत्याने सुरू राहण्यास मोठी मदत होत आहे.
विश्वस्त मंडळाची भाविकांसाठी आस्थेने सेवा –
मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व विश्वस्त भाविकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या सोयी-सुविधांची काळजी घेतली जाते. भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळावे, अन्नछत्रात कोणतीही गैरसोय होऊ नये आणि धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून नियोजन केले जाते.
श्रावणी शनिवारच्या दिवशी झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरही मंदिर समिती आणि सेवेकऱ्यांनी उत्तम नियोजन करत भाविकांना सेवा दिली. दिवसभर हजारो भाविकांनी श्री जागृत मारुतीचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने भारलेल्या या वातावरणामुळे गौडगाव परिसराला जणू भक्तीमय यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिराची श्रद्धा आणि अन्नछत्र मंडळाची सेवा यामुळे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून, मंदिर परिसर हे श्रद्धाळूंसाठी विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र बनले आहे. भाविकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत असलेले अन्नछत्र मंडळ हे परिसरासाठी एक सेवाभावी आणि आधारवड ठरत असल्याची भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button