धार्मिक
दुसऱ्या श्रावण सोमवारी जेऊरच्या काशीविश्वेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील प्राचीन स्वयंभू श्री काशीविश्वेश्वर (काशीलिंग) मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू होती.
श्रावण सोमवारनिमित्त श्री काशीविश्वेश्वराची विधिवत पूजा, अभिषेक तसेच होम-हवन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी देवस्थान ट्रस्ट, जेऊर यांच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात आले होते. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दासोहामध्ये उपलब्ध प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले. श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात दिवसभर धार्मिक आणि भक्तिमय वातावरण होते.
प्राचीन स्वयंभू काशिलिंगाचे पवित्र स्थान
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे असलेले श्री काशीविश्वेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि स्वयंभू श्री काशिलिंगाचे पवित्र स्थान मानले जाते. या पावन भूमीला आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व लाभले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या ग्रंथपरंपरेत जेऊर येथील काशीविश्वेश्वर मंदिराचा उल्लेख केला असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिराला स्वामीभक्तांच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर जेऊर येथील श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा अनेक भक्त श्रद्धेने पाळतात. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आणि त्यानंतर काशिलिंगाचे दर्शन घेतल्याने आध्यात्मिक समाधान व पुण्यप्राप्ती होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांनी वेळ काढून जेऊर येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरास भेट देऊन स्वयंभू श्री काशिलिंगाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



