सांस्कृतिक

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान

भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीच्या प्रगल्भ परंपरेत शहनाईचे मधूर स्वर प्रसिध्द करणारे शहनाई वादक पंडीत उस्ताद बिस्मिल्ला खान यांची 21 ऑगस्ट स्मृतिदिन.
पंडीत बिस्मिल्ला आपल्या शहनाईला बेगम म्हणत असत तर पंडीत जसराज, हरिप्रसाद चौरसिया यांच्या दृष्टीने उस्ताद बिस्मिल्ला खान एक संत संगीतकार होते. या शहनाईतील पांडित्याने पंडीत बिस्मिल्ला खान यांना केवळ प्रसिध्दीच दिली नाही तर 1969 आशिया संगीत संमेलनातील रोस्टम पुरस्कारासह भारतरत्न पर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारताबाहेर विश्‍वभ्रमण करुन संगीत क्षेत्रात शहनाईला मानाचे स्थान पंडीत बिस्मिल्ला खान यांच्यामुळे मिळाले आहे.
21 मार्च 1916 बिहारमधील डुमराव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा शहनाई नवाज उस्ताद सालार हुसैन खाँ या परिवाराचे मूळ पुरुष. त्यानंतर गेल्या पाच पिढ्यांपासून बिस्मिल्ला खान यांचे घराणे शहनाई वादन करीत आहे. बिस्मिल्ला खान यांना त्यांचे काका अली बक्श विलायतू यांनी संगीताचे शिक्षण दिले. अली बक्श बनारसच्या विश्‍वनाथ मंदिराचे अधिकृत शहनाई वादक होते. मिळालेल्या या शिक्षणातून पंडीत बिस्मिल्ला यांनी शहनाईच्या विस्ताराबाहेर जावून जटील शास्त्रीय संगीत व शहनाई यांचा मेळ साधत स्वतःची शैली निर्माण केली, असा प्रयत्न यापूर्वी कोणत्याही शहनाई वादकाने केला नव्हता. त्यांनी भारताच्या पहिल्या प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर शहनाई वादन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी अफगाणिस्तान, युरोप, इराण, इराक, कॅनडा, पश्‍चिम आफ्रिका, अमेरिका, सोव्हिएत संघ, जापान, हाँगकाँग आणि जगभरातील अनेक देशांमध्ये शहनाई वादन केले आहे. धर्माने शिया मुसलमान असले तरी बिस्मिल्ला खान सरस्वती देवीचे निस्सीम भक्‍त होते. त्यांना बनारस हिंदू विश्‍वविद्यालय आणि शांतीनिकेतन यांनी डॉक्टरेट ही मानद उपाधि प्रदान केली आहे.
बिस्मिल्ला खान शहनाईला ‘हमारी बेगम’ असे म्हणत असत आणि शहनाईवादन – संगीतच त्यांचे पूर्ण जीवन होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तर केवळ शहनाई त्यांच्या जीवनाचा भाग झाली होती. बिस्मिल्ला यांच्या नावाबद्दल एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे दादाजी रसूल बख्श खान यांनी त्यांच्याकडे पहात बिस्मिल्ला असे म्हटल्याने, त्यांचे नाव बिस्मिल्ला ठेवले गेले. त्यांचे मूळ नाव कमरुद्दीन होते. त्यांचे पूर्वज बिहारच्या भोजपूर राजाचे दरबारी संगीतकार होते. त्यांचे पिता पैंगबर खान यांना याच परंपरेतून डुमराव रियासतीच्या महाराज केशवप्रसाद यांच्या दरबारात शहनाईवादनाचे काम मिळाले. सहा वर्षाचे असतानाच बिस्मिल्ला यांना बनारसला पाठविण्यात आले आणि त्यांच्या संगीत शिक्षणास सुरुवात झाली. बिस्मिल्ला खान तिथे आपले काका अली बख्श विलायतू यांच्याकडून शहनाई वादन शिकू लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार संगीत हे असे क्षेत्र आहे की, तिथे जात पात धर्म या गोष्टी नाहीत. संगीत हा एक स्वतः वेगळा धर्म आहे आणि तो कोणत्याही धर्माचे वाईट चिंतीत नाही.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाशी पण बिस्मिल्ला खान यांचे एक अतूट नाते होते. 1947 मध्ये लालकिल्ल्यावर तिरंगा फडकण्याआधी बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईने आझादीचा संदेश उपस्थितांच्या मनामनात भरला होता. त्यानंतर 15 ऑगस्टला पंडीत बिस्मिल्ला खान यांचे शहनाई वादनाची परंपराच सुरु झाली.
पंडीत बिस्मिल्ला खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही संगीतकार म्हणून योगदान दिले आहे. त्यातील गाजलेले चित्रपट म्हणजे सन्नादी अपन्ना (कन्नड), गूंज उठी शहनाई (हिंदी), सत्यजीत रे यांचा चित्रपट जलसाघर. त्यांनी चित्रपटसंगीतातील अखेरची शहनाई वाजवली ती आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेश या चित्रपटात. ये जो देश है तेरा या गाण्यातील शहनाईचे मधुर स्वर पंडीत बिस्मिल्ला खान यांचेच आहेत.
इतर संगीतकारांच्यादृष्टीने उस्ताद बिस्मिल्ला खान यांना शहनाईने प्रसिध्दी दिली असे म्हणण्यापेक्षा उस्तादांनी शहनाईला प्रसिध्दी दिले असे म्हणावे लागेल. आजही देशविदेशातील अनेक चाहते या शहनाईचे दिवाने आहेत. त्यांना 1956 मध्ये संगीत नाटक अकादमीने सन्मानीत केले होते. त्यानंतर 1961 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 1968 मध्ये पद्मभूषण, 1980 मध्ये पद्मविभूषण, 2001 मध्ये भारतरत्न असे भारताचे सर्वोच्च सन्मान प्राप्त झाले आहेत. मध्यप्रदेश सरकारने तानसेन पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी संगीत क्षेत्रात जे काही कमावले ते लोकांच्या मदत करण्यासाठी तेवढ्याच सढळ हाताने खर्च ही केले. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या काळात आर्थिक विपन्नावस्थेत काही काळ गेला. पण या विपन्नावस्थेची बातमी दूरचित्रवाहिन्यांवर आल्यानंतर भारत सरकारने त्यांना आर्थिक मदत केली. दिल्लीच्या इंडिया गेट येथे शहनाई वादन करण्याची अंतिम इच्छा घेऊन या शहनाई नवाज उस्तादाने 21 ऑगस्ट 2006 ला 90 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला.
– योगेश शुक्ल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button