सामाजिक
श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य , नागरिकांसह भाविक भक्तातून संताप !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे परिसरातील नागरिक व भाविक भक्ता मधून संताप व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेकडून या ठिकाणचा कचरा वेळेवर उचलण्यात येत नसल्याने परिसरामध्ये डासांचे प्रमाण वाढले असून रोगराई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील वाले वाड्याजवळील बाजूस असणाऱ्या रिकामा जागेमध्ये घाणीचे साम्राज्य तसेच कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हे तसेच व्यापारी वर्ग हा या ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही कर्मचारी हे थातूरमातूर उत्तरे देत आहेत. दोन – दोन आठवडे या ठिकाणचा कचरा उचलण्यात येत नसल्याने या परिसरामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास हा परिसरात राहणाऱ्या लोकांना होत आहे .तसेच या भागातून भाविक भक्त हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडे गर्दीच्या वेळी जात असतात. या भाविकांनाही या घाणीतून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे भाविक भक्तातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेने आठवड्यातून दोन वेळा या ठिकाणची स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह भाविक भक्तातून केली जात आहे.



