भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर !

पोलिसांच्या ‘SIT’कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,
मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे पोलिसांनी (Thane Police) भिवंडीत पर्दाफाश केला आहे. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या ‘शिक्षक पात्रता परीक्षेचा’ (TET) (Teacher Eligibility Test) पेपर चक्क दीड कोटी रुपयांना विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंनगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे परीक्षेच्या काही तास आधीच तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका ‘ओरिजिनल’ असल्याचे खुद्द शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कसा रचला गेला सापळा ?
या संपूर्ण कारवाईची सुरुवात एका अत्यंत गुप्त आणि खात्रीलायक माहितीवरून झाली. भिवंडी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. पवन बनसोड यांना २७ जून रोजी टीईटीचा पेपर विकण्यासाठी काही जण भिवंडीत येणार असल्याची पक्की खबर मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी कोंनगाव परिसरात अचूक सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत टीईटीच्या प्रश्नपत्रिकेचे संच सापडले. तत्काळ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून खात्री केली असता, हा उद्या होणाराच मुख्य पेपर असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी तिघांनाही जागीच अटक केली.



