शैक्षणिक

पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची विज्ञान कार्यशाळा तसेच ISRO सहलीसाठी निवड

 

करमाळा (प्रतिनिधी) : जनसेवा प्रतिष्ठान, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. सी. व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षा २०२६’ मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेसाठी विद्यालयातून कु. ईश्वरी नानासाहेब नलवडे, कु. ऋतुजा रामचंद्र भुजबळ, सार्थक प्रवीण जाधव, कु. मनश्री भाऊसाहेब करगळ, श्रीनाथ नामदेव धगाटे, शिवतेज राजेश बरडे व इयत्ता आठवी मधून कीर्तीध्वज भागेश्वर बरडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट तयारी व मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

यापैकी इयत्ता सहावीच्या कु. ईश्वरी नानासाहेब नलवडे व कु. ऋतुजा रामचंद्र भुजबळ यांनी विशेष यश संपादन करत भारताची मानाची अवकाश संशोधन संस्था ISRO येथे आयोजित विशेष शैक्षणिक सहल तसेच विज्ञान कार्यशाळेसाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विशेष म्हणजे या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थिनींना विमानप्रवासाचा अनुभव घेण्याचीही संधी मिळणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अभिमानास्पद, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय संधी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि संशोधनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ५ एप्रिल रोजी झालेल्या या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता, जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर यशस्वी कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.

या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला नवी उंची प्राप्त झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही विज्ञान व संशोधन क्षेत्रात मोठी भरारी घेण्याची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण रावगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव काकडे, सचिव भैय्यासाहेब काकडे, मुख्याध्यापक विजय कोळेकर, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button