वर्तमानपत्राच्या कागदावर वडापाव, भेळ दिल्यास थेट कारवाई !

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा राज्यातील विक्रेत्यांना कडक इशारा….
मुंबई – हॉटेल, टपऱ्या किंवा गाडीवर वडापाव, भेळ, भजी यांसारखे चमचमीत पदार्थ वर्तमानपत्राच्या (वृत्तपत्राच्या) कागदावर घेऊन खाणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी आहे.अन्न व औषध प्रशासनाचे(एफ.डी.ए.)(F.D.A.) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यपदार्थ बांधण्यासाठी किंवा ग्राहकांना वाढण्यासाठी वृत्तपत्राच्या कागदाचा वापर करण्यास संपूर्ण राज्यात कायद्याने बंदी असल्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरली जाणारी शाई आणि त्यातील रसायने आरोग्यासाठी अत्यंत घातक व विषारी असल्याने, हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की ,
वृत्तपत्राच्या कागदाचा वापर अन्नपदार्थांसाठी करणे हा मानवी आरोग्याशी खेळ असून,
यापुढे असे करताना कोणताही विक्रेता आढळल्यास त्याच्यावर थेट दंडात्मक आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हा आदेश डावलून ग्राहकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गय केली जाणार नाही.
त्यामुळे आता केवळ विक्रेत्यांनीच नव्हे ,
तर सर्वसामान्य नागरिकांनीही जागरूक राहून वर्तमानपत्राच्या कागदावर अन्नपदार्थ घेणे पूर्णपणे टाळावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



