करमाळा येथे जागतिक पर्यावरणदिन उत्साहात साजरा

“झाडे लावा, पर्यावरण वाचवा; शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारा!”
करमाळा ( आयुब शेख )जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळ्यात पर्यावरणपूरक शेतीचा संदेश. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, अंतर्गत साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, करमाळा येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास शिल्पा ठोकडे (तहसीलदार करमाळा), महादेव शिंदे (सहायक गट विकास अधिकारी पं. स. करमाळा) सुषमा बिचुकले (तालुका अभियान व्यवस्थापक)इनायत शेख (कृषी विस्तार अधिकारी)टेक्नोसर्व्ह व MSRLM ची सर्व तालुका टीम, ग्रामसखी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी सुषमा बिचुकले BMM तसेच साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक शेती, गांडूळखत निर्मिती, अझोला उत्पादन, वृक्षारोपण तसेच विविध शाश्वत कृषी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
प्रमुख पाहुण्या शिल्पा ठोकडे यांनी “जागतिक हवामान बदल आणि पर्यावरणपूरक शेती” या विषयावर मार्गदर्शन करताना नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.



