फडणवीस सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहू नका: खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत आठ तास वीज द्या; महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांसह धडक देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जाब विचारला, ऊर्जा व गृहखाते फेल तर मुख्यमंत्रीही अपयशी – जनतेच्या प्रश्नांऐवजी फक्त निवडणुकांत व्यस्त असल्याची घणाघाती टीका
सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीपंपांना मिळणारा वीजपुरवठा आठ तासांवरून प्रथम सहा तास आणि त्यानंतर चार तासांपर्यंत कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महावितरणच्या सोलापूर मंडळ कार्यालयावर धडकले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देत शेतीपंपांसाठीचा वीजपुरवठा पूर्ववत किमान आठ तास सुरळीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितले की, ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. वीजपुरवठ्यातील कपातीमुळे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ग्रामीण भागात वारंवार होणारे लोडशेडिंग, सिंगल फेज आणि थ्री फेज वीजपुरवठ्यातील बिघाड यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणेही कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांना नदीतून पाणी उपसण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विद्युत पंपांवर अवलंबून राहावे लागते. मात्र अपुरा वीजपुरवठा असल्याने पिके करपण्याची वेळ आली असून पशुधनासमोरही पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. गावोगावी दौऱ्यांदरम्यान शेतकरी आणि ग्रामस्थांकडून वीजपुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस सरकारवर टीका करताना खासदार शिंदे म्हणाल्या की, शेतकऱ्यांनी किती सहन करायचे? खते महाग आहेत, डिझेल मिळत नाही, वीज नाही; मग शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? दरवर्षी पेरणीच्या काळात वीजेचा प्रश्न निर्माण होतो, मात्र सरकारकडे कोणतेही नियोजन दिसत नाही. सरकारला शेतकरी, शेती आणि ग्रामीण भागातील प्रश्नांपेक्षा निवडणुका अधिक महत्त्वाच्या वाटत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा अशी दोन्ही महत्त्वाची खाती असूनही दोन्ही विभाग पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री फेल ठरल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, शेतीपंपांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करून किमान आठ तास नियमित व सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी महावितरण प्रशासनाकडे केली.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, मिलिंद भोसले, सुनील खडके, विजय वागज, शंकर नागशेट्टी, अरुण जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, सायबण्णा पुजारी, हणमंतू कोळी, शरणू पुजारी, हासन कोरबू, चंदू येनगुरे, निलप्पा देसाई, बसवेश्वर कळके, श्रीमंत टेंगळे, किरण भोसले, सिद्धाराम गाढवे, भूताळी पुजारी, येणगुरे, विजू पुजारी, आवण्णा तुकमाळी, दौलू सलगरे, मल्लिकार्जुन हजगोंडा, मारुती जेवळगी, मारू पुजारी, उदय बागल, बमलिंगप्पा कडगंची, अंबरीश टेंगळे, हर्षवर्धन बागल, महादेव नारायणकर, रविकिरण मेहता, महादेव मोरडे, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



