मनोरंजन

गीतकार आनंद बक्षी

फिल्मफेअर अवार्डमध्ये तब्बल ४० वेळा नामांकन मिळालेले गीतकार आनंद बक्षी यांची २१ जुलै जयंती.आनंद बक्षी यांनी लिहीलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते.
आनंद बक्षी हे नाव केवळ गाण्यांनी लोकप्रिय झालेल्या अनेक चित्रपटांच्या नामावली सातत्याने दिसणारे नाव आहे. आजही अनेक वर्षांपासून रसिकांच्या ओठावर रुळणाऱ्या आणि मनात रुंजी घालणाऱ्या गीतांच्या गीतकाराचा शोध घेता बऱ्याच ठिकाणी आनंद बक्षी हेच नाव सापडते. सोप्या आणि साध्या शब्दांनी लिहिलेली लोकप्रिय होणारी गीत. केवळ शब्दानी सजलेली गीते. दोस्ती या शब्दावरच त्यांचे लोकप्रिय गीत यह दोस्ती हम नही छोडेगे. आजही अनेक मित्रांच्या ओठी असणारे हे गीत. जसा सुगंध हवेत आणि चंदन पाण्यात मिसळते त्याप्रमाणे सोप्या सोप्या शब्दांतून व्यक्त होणारी भावना या गाण्यातून जाणवते. ४३ वर्षे एकामागोमाग एक सुंदर आणि अकृत्रिम गीते त्यांनी लिहिली, अगदी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत.
२१ जुलै १९३० ला रावळपिंडी येथे जन्मलेले आनंद बक्षी यांनी लहानपणापासून एकच स्वप्न पाहिले, ते म्हणजे मुंबईला जाऊन पार्श्वगायक बनण्याचे. या स्वप्नाच्या मागे धावत धावत ते मुंबईला आले. उपजिविकेसाठी जलसेना कराचीच्या कार्यालयात नोकरी केली. मात्र तेथील वरिष्ठांशी न पटल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्याचवेळी भारत पाकिस्तान फाळणी झाल्याने त्यांना आपल्या लखनौ येथील घरी परतावे लागले. तिथे काही दिवस त्यांनी टेलिफोन ऑपरेटरची नोकरीसुध्दा केली पण स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते आणि पुन्हा एकदा त्यांनी मुंबईची वाट धरली.
मुंबईला बरेच दिवस काही काम मिळालेच नाही. केवळ संगीतकार आणि निर्मात्यांचे उंबरठे झिजवले गेले. अखेरीस वैतागून आनंद बक्षी दिल्लीला आले. इएमइ या कंपनीत त्यांना मोटार मॅकेनिकची नोकरी मिळाली. पण कामात मन काही रमत नव्हते अखेरीस त्यांचे स्वप्न पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना मुंबईला घेऊन आले. मात्र यावेळी नशीब खुलले आणि भगवानदादांची भेट झाली. ते त्यांच्या बडा आदमी (१९५६) या चित्रपटासाठी नवीन गीतलेखक शोधत होते. अॅडव्हॉन्स देऊन भगवानदादांनी त्यांच्याकडून या चित्रपटासाठी गाणी लिहून घेतली. मात्र नशीब उघडले असले तरी दैवाने भाळी यश लिहिण्यासाठी १९६२ साल उजाडावे लागले. सूरज प्रकाश यांचा चित्रपट मेहंदी लगी मेरे हाथ (१९६२) आणि जब जब फुल खिले (१९६५) प्रदर्शित झाले आणि आनंद बक्षी यांची मेहनत रंग लायी. परदेसियों से न अँखिया मिलाने आणि यह समा है प्यार का या दोन गाण्यांनी त्यांना लोकप्रिय केले. यानंतरचा चित्रपट मिलन (१९६७) यात लिहिलेल्या त्यांच्या गाण्यांनी त्यांना गीतकारांमधील सर्वोच्च स्थानी पोहचवले. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सावन का महिना, बोल गोरी बोल, राम करे ऐसा हो जाये, मै तो दिवाना, और हम तुम…. युग युग के ही गाणी देशभरातील घराघरातून ऐकू येवू लागली.
त्यांच्या जीवनातील सुवर्णयुगच अवतरले होते. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत काम करताना फर्ज (१९६७), दो रास्ते (१९६९), बॉबी (१९७३), अमर अकबर ॲथोनी (१९७७), एक दुजे के लिए (१९८१), राहुल देव बर्मन यांच्यासोबत कटी पतंग (१९७०), अमरप्रेम (१९७१), हरे रामा हरे कृष्णा (१९७१), लवस्टोरी (१९८१) या चित्रपटांतील लोकप्रिय कर्णमधूर गाणी लिहिली. अमरप्रेममधील बडा नटखट है किशन कन्हैय्या, कुछ तो लोग कहेंगे, ये क्या हुआ आणि रैना बिती जाये ही गाणी तर आजही रसिकांच्या हृदयावर राज्य करीत आहेत. आता तर निर्मातेदेखील गाण्यांसाठी आनंद बक्षींना शोधू लागले. निर्मात्यांचा विचार करता राजकपूर यांच्याबरोबर बॉबी (१९७३), सत्यम शिवम्‌ सुंदरम (१९७८), सुभाष घईसाठी कर्ज (१९८०), हिरो (१९८३), कर्मा (१९८६), रामलखन (१९८९), सौदागर (१९९१), खलनायक (१९९३), ताल (१९९९), यादे (२००१) आणि यश चोपडा यांच्यासोबत चांदनी (१९८९), लम्हे (१९९१), डर (१९९३), दिल तो पागल है (१९९७), आदित्य चोपडाकरिता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५), मोहब्बते (२०००) या चित्रपटातील सदाबहार गाणी एकाच माणसाच्या लेखणीतून साकारली आहेत.
पण आनंद बक्षींचे डोळ्यातील स्वप्न मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. एवढी लोकप्रिय गीते दिल्यानंतरही पार्श्वगायक बनण्याचे स्वप्न अपुरेच होते. ते पूर्ण झाले १९७२ मध्ये मोम की गुडिया या चित्रपटातून. गीत बागों मे बहार आयी हे लता मंगेशकरसोबत आनंद बक्षींनी गायलेले गाणं. या व्यतिरिक्त त्यांनी शोले (१९७५), महाचोर (१९७६), चरस (१९७६), विधाता (१९८२), जान (१९९६) या चित्रपटातून पार्श्वगायन केले.
शहंशाह (१९८८), प्रेम प्रतिज्ञा (१९८९), मै खिलाडी तू अनाडी (१९९४) आणि आरजू (१९९) या चित्रपटांचे ॲक्शन डायरेक्टर म्हणून आनंद बक्षी यांनी काम पाहिले. एवढेच नाही तर पिकनिक (१९६६) या चित्रपटात अभिनयही केला आहे.
आनंद बक्षी यांच्या गीतांचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील शेतकरी ते शहरात राहणारा बुध्दीजीवी या दोघांनाही समजतील असे शब्द. ते असे गीतकार होते की, त्यांनी लिहून दिलेले गाणे पुन्हा फेरबदल करण्याची कधीही गरज पडली नाही. गाणे हातात आले म्हणजे ते रेकॉर्ड झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार गाणे लिहिण्यासाठी त्या चित्रपटाची कथा, पटकथा आणि परिस्थिती माहितअसणे गरजेचे आहे. एकदा हे समजले की, गाण्यातील पात्राची मनःस्थिती, परिस्थिती आणि वय यांचा काही फरक पडत नाही. मग गोष्ट ६० – ७० ची असो की आजची.
त्यांनी सगळ्यात जास्त काम संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत केले. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांकरिता त्यांना ४० वेळा फिल्मफेअर नामांकन मिळाले त्यापैकी आदमी मुसाफिर है (अपनापन १९७७), तेरे मेरे बीच कैसा है यह बंधन (एक दुजे के लिए १९८१), तुझे देखा तो यह जाना सनम (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५) , इश्क बिना क्या जीना यारों (ताल १९९९) या गाण्यांकरिता चार वेळा फिल्मफेअर मिळाले. त्यांनी संगीतकारांच्या तीन पिढ्यांसोबत काम केले आहे. आणि प्रत्येक पिढीच्या संगीतकाराला त्याचे मनपसंद गीत आनंद बक्षींकडून मिळण्यास कोणतीही अडचण आली नाही.
आनंद बक्षींचे ३० मार्च २००२ रोजी मुंबईत देहावसान झाले. फुफ्फुस आणि हृदयाच्या आजारामुळे अनेक दिवस नानावटी हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज आनंद बक्षी आपल्यात नाही पण आजही त्यांची गाणी ऐकली की प्रेमातील निरागसता आणि सच्चेपणाची जाणीव होते जी आजच्या चित्रपटातून गीतातून गायब झाले आहे. अकृत्रिमतेपेक्षा कृत्रिमता जाणवू लागली आहे. जसे काही आनंद बक्षी गेल्यानंतर चित्रपट संगीतातील शब्दांनीसुध्दा गाण्यांकडे पाठ फिरवली आहे जणू काय ते आता परत त्यांच्यासारख्या गीतकाराची वाट पहात आहेत.
– योगेश शुक्ल, जळगाव फेसबुक वॉलवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button