महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मागील वर्षी ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चालू वर्ष हे राज्यात समता आणि सामाजिक समरसतेचे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या विशेष महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत राज्याच्या विकासाचा आणि भविष्यातील आव्हानांचा विस्तृत आढावा घेतला. हा दिवस केवळ उत्सवाचा नसून , विकासाच्या वाटचालीत राज्याने आतापर्यंत किती पल्ला गाठला आहे आणि भविष्यात कुठे पोहोचायचे आहे , याचे आत्मपरीक्षण करण्याचा हा क्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या जागतिक पातळीवर अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असून आखाती देशांमधील युद्धामुळे जगभरात अस्थिरता आणि झळ पोहोचत आहे. मात्र , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऊर्जा सुरक्षा , पर्यायी तेल स्रोत आणि सौर ऊर्जा विस्तार यावर भर दिल्याने भारताला आणि राज्याला या जागतिक संकटाची फारशी झळ बसलेली नाही , असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. आर्थिक आघाडीवर महाराष्ट्र अतिशय भक्कमपणे उभा असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा तब्बल १४ टक्के इतका आहे. तसेच वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १,६४,८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळवली असून हे प्रमाण देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ३९ टक्के आहे. डॅव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्याने ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून यातून आगामी काळात ४० लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. जागतिक आर्थिक समस्यांच्या सावटातही महाराष्ट्र राज्याने जगातील ३० वी अर्थव्यवस्था म्हणून मोठी झेप घेतली आहे. हा विकास केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता गडचिरोली , नंदुरबार आणि धुळे यांसारखे जिल्हे देखील आता गुंतवणुकीच्या नकाशावर ठळकपणे आले आहेत.
पायाभूत सुविधांच्या विकासावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की , सध्या मुंबई , पुणे आणि नागपूर येथे एकूण १७३ किमी लांबीचा मेट्रो मार्ग यशस्वीपणे कार्यरत आहे. प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावणे हा या विकासामागचा मुख्य उद्देश असून यासाठी दरवर्षी नव्याने ५० किमी मेट्रो मार्ग सेवेत आणण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे.
शेती आणि हवामानाबाबत बोलताना त्यांनी राज्यातील बळीराजाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २०२६ मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी हा अंदाज गांभीर्याने घ्यावा. पेरणीची कोणतीही घाई करू नये आणि कृषी विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे , असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच पाणी आणि चाऱ्याचे नियोजन सुरू केले असून जलयुक्त शिवार व गाळमुक्त शिवार या योजनांच्या कामांना गती देण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. पाण्याची बचत करणे हे आता प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा. राज्यात खते आणि बियाणांचा कोणताही तुटवडा भासणार नाही आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे , याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. कितीही नैसर्गिक आपत्ती आल्या तरी राज्याचा विकास रथ थांबणार नसून , वर्ष २०४७ पर्यंत राज्याला ५ ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था बनवण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगून आत्तापासूनच कामाला सुरुवात केल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.




