तथागत भगवान गौतम बुद्ध

तथागत म्हणजे तथ्य (सत्य) + आगत(गतीमान) ; तथागत म्हणजे जो सत्याच्या दिशेने गतीमान आहे असा प्रवासी /उपासक.
सत्यपथावरुन मार्गक्रमण करणारा असा महामानव जो सत्याच्या शोधात पुढे निघून गेला आहे तो म्हणजे तथागत.
तथागतचा अर्थ ‘यथाचारि तथाभाषि’ असाही लावला जातो. म्हणजेच जो ज्या प्रमाणे बोलतो त्या प्रमाणे कृती करतो. जे केवळ सत्यमार्ग अनुसरतात ते!
भगवान गौतम बुद्ध खऱ्या अर्थाने तथागत होते!
बुद्धांचा विश्वास होता की प्रत्येकामध्ये बुद्ध आहे, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होण्याचा प्रवास होय. आपल्या सगळ्यांमध्येच ती बुद्ध होण्याची क्षमता असते. तरीही आपल्या सर्वांचा प्रवास पूर्णत्वाकडे होत नाही कारण आपण सामान्य, संसारी माणसं आहोत.
ज्याप्रमाणे सूर्यफुल सदैव सूर्याच्या दिशेने वळलेले असते त्याप्रमाणे आपण किमान बुद्धफुल होऊ शकतो म्हणजेच सदैव बुद्धांच्या विचारदिशेकडे आपली नजर असली पाहिजे! इतके झाले तरी किमान काही ज्ञान प्राप्त होऊ शकते, निर्वाणाविषयीच्या संकल्पना कळू शकतात आणि बुद्धत्वाची ओढ लागते!
बुद्धांचे मूळ नाव ‘गोतम‘! पाली भाषेत औ हा स्वरच नाही आणि बुद्धांनी त्यांचा उपदेश पाली भाषेत केला होता. भगवान महावीरांनी त्यांचा उपदेश अर्धमागधीमध्ये केला होता. जास्तीत जास्त लोकांना आपला उपदेश कळावा, आपले म्हणणे उमजावे म्हणून त्यांनी संस्कृतऐवजी प्राकृत भाषेस प्राधान्य दिले होते. त्रिपिटकातही बुद्धांचा उल्लेख श्रमण गोतम असाच केला गेलाय.
बुद्ध ही व्यक्ती नसून ज्ञानाची अवस्था आहे अशी त्यांची धारणा होती.
वयाच्या सोळाव्या वर्षी राजकुमारी यशोधराशी विवाह झालेले शाक्य गणराज्याचे राजकुमार ते विरक्तीच्या वाटेवर सन्यस्त वृत्तीने निघालेले उपासक, जीवन मृत्यूच्या निर्वाणसूत्राचे भाष्यकार, धम्मउपासना नि जनप्रबोधन असा त्यांचा प्रवास होता.
ज्ञानप्राप्ती करताना शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा त्यांचा मध्यम मार्ग होता.
प्रज्ञा, शील आणि करुणा ही त्यांनी सांगितलेली बुद्ध धम्माची तीन अंगे होती!
साधने ठाऊक आहेत, इच्छाशक्ती ही आहे तरीही आपण बुद्ध होऊ शकत नाही हे वास्तव आहे परंतु आपण त्यांच्या मार्गावरून चालू तरी शकतो, मात्र त्यासाठी दृढ निश्चय हवा, विकारांपासून दूर जाण्याची तयारी हवी!
त्यांच्या विचारांचं अनुसरण जरी केलं तरी अंतःकरणातील अंधार नष्ट होऊन दिव्य ज्ञानदृष्टी प्राप्त होते.
जीवनाचा खरा अर्थ उमगतो, कथित दुःखापासून मुक्ती मिळते आणि सुखाचा शोधही संपतो.
हेच तर ‘अत्त दीप भव’ !
बुद्ध जयंती दिनी शुभेच्छा देताना अधिकाधिक लोकांनी बुद्ध वाचावेत नि बुद्धविचार समजून घेण्याचा प्रयत्न व्हावेत असा आग्रह धरला पाहिजे.
– समीर गायकवाड




