सामाजिक

क्रांतिसिंह नाना पाटील

(जन्म :३ ऑगस्ट १९०० – मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, ज्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि अदम्य धैर्याने इतिहास घडवला. अशा प्रेरणादायी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील हे नाव म्हणजे शोषित, वंचित, आणि अन्यायग्रस्तांसाठी दिलेल्या संघर्षाचं प्रतीक. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभा राहिलेला स्वातंत्र्यसैनिक, भूमिगत सरकारचा शिल्पकार, आणि सामाजिक न्यायासाठी अखंड झगडणारा नेता असा त्यांचा बहुआयामी परिचय आहे. नाना पाटील हे देशभक्त झुंजार नेते म्हणून ओळखले जातात. महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा निष्ठेने चालवणारे क्रांतिसिंह यांचा सुरुवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीकडे कल होता. १९१६ मध्ये तत्कालिन मुलकी परीक्षा उत्तीर्ण होऊन नाना पाटील यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. त्यांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. तलाठ्याची नोकरी करत असतानाही नानांचा चळवळ्या स्वभाव त्यांना शांत बसू देत नव्हता. समाजातील अनिष्ठ चालीरीती त्यांना अस्वस्थ करत. अंधश्रद्धा, हुंडा, अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी गावागावातून दौरे करुन याविरुद्ध बंड पुकारले. स्वातंत्र्य लढ्याच्या जोडीनं बहुजन समाजाच्या विकासाकडं त्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं होतं. यासाठी त्यांनी स्वतःच्या नोकरीचाही त्याग केला. ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यातून त्यांना लढण्याचं बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिलं. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या नानांची भाषणे लोकांना प्रभावित करीत होती आणि त्यातूनच लोकांना प्रेरणा मिळाली. खर म्हंटल तर त्यांचा परिचय देताना शब्द अपुरे पडतील. त्यांच्या बदल सांगताना काय आणि किती सांगावे हे हेच कळत नाही.
इ.स. १९२० ला लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि महात्मा गांधी यांचे युग सुरु झाले. गांधीजींच्या व्यक्तीमत्वावर अवघा भारत लुब्ध झाला होता. इ.स.१९३० रोजी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु झाली. महात्मा गांधीनी एप्रिल महिन्यात दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. सर्वत्र कायदेभंगाची लाट पसरली. कोणी सरकारी नोकरीवर पाणी सोडले, कोणी शिक्षण अर्ध्यावर सोडले, कोणी बायका मुलांचा संसार वाऱ्यावर सोडला, कोणी पिढीजात संपत्तीवर लाथ मारली, कोणी अंगावरची भरजरी वस्रे फेकून देऊन जाडीभरडी वस्रे परिधान केली आणि कायदेभंगाच्या चळवळीत स्वतःला झुगारुन दिले. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कायदेभंग चळवळीपासून अलिप्त होते. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. नाना पाटील आणि त्यांच्या संघर्षाने ‘आपुला आपण करू कारभार‘ हे सूत्र सामाजिक अभियानाच्या आधारभूत बनवले. त्यांच्या योगदानाने नाना पाटील यांनी अनेक लोकांना सामील केले आणि तुफान सेना नावाची स्थापना केली. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही त्यांनी यशस्वीरीत्या राबवले.
प्रति सरकार म्हणजे काय?
हे एक भूमिगत सरकार होतं, जे ब्रिटिश सत्तेला विरोध करण्यासाठी स्थापन केलं गेलं. १९४३ ते १९४६ या कालावधीत सातारा जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये “प्रति सरकार” कार्यरत होतं. हे सरकार
प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारच्या प्रचारासाठी ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केले जात होते.
जनतेसाठी न्यायदान, स्वराज्याची चाचणी, आणि ब्रिटिश धोरणांचा प्रतिकार करत होतं. या चळवळीत शेतकरी, कामगार, आणि सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. नाना पाटील यांनी लोकशाहीच्या तत्त्वांवर आधारलेलं प्रशासन उभं केलं, ज्यामुळे त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. वारकरी संप्रदायाचा पगडा असणाऱ्या नाना पाटील यांच्याकडे वक्तृत्वशैली असल्याने ग्रामीण भागात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी जागृती सुरू केली. आपल्या भाषणातून गाव गाड्यातल्या प्रत्येकाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास त्यांनी प्रेरित केले. त्यामुळे जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढवय्ये नेतृत्व म्हणून नाना पाटील यांचे नाव वाढत गेले.
२६ मे १९४६ रोजी नाना पाटील यांच्या कार्याची दखल ज्येष्ठ पत्रकार “मराठा’ कार प्र. के. अत्रे यांनी घेतली. मुंबईत ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने सत्कारही केला. त्यावेळी त्यांना “क्रांतिसिंह’ ही पदवी बहाल केली आणि नाना पाटील “क्रांतिसिंह नाना पाटील’ झाले.
श्री. अत्रे यांनी नाना पाटील यांच्यासह प्रतिसरकारमधील सहकाऱ्यांना क्रांतिवीर म्हणून संबोधले. त्यांचाही उचित गौरव व सत्कारही केला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये सक्रीय असलेले क्रांतिसिंह स्वांतत्र्योत्तर काळात काँग्रेससोबत राहिले नाही. ते शेतकरी पक्षात गेले. सुरुवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीकडे आकृष्ट झालेले नाना पाटील यांनी अखेरच्या दिवसांमध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. दोन वेळा ते लोकसभेवर निवडून देखील गेले होते.
१९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड. मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते. त्यांनी भारतीय सांस्कृतिक मंडळातून रशियाचा दौरा केला. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पाच-सहा दशक घोंगावणारा हे वादळ अखेर ६ डिसेंबर १९७६ रोजी शांत झाले.
आजच्या काळात, सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी नाना पाटील यांचं जीवन हे एक आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वाने दाखवून दिलं की, सत्य, धैर्य, आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर कोणतंही मोठं लक्ष्य साध्य करता येऊ शकतं. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे योगदान विसरणं अशक्य आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांचं नाव सातारा आणि महाराष्ट्राच्या जनमानसात कोरलं गेलं आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी विविध ठिकाणी स्मारकं उभारण्यात आली आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील हे केवळ एक नेता नव्हते, तर लोकशाहीच्या मूळ तत्त्वांचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या त्यागाची आणि संघर्षाची कहाणी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अजरामर आहे. आज त्यांच्या विचारांवर चालत आपण त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया!
श्रीकांत अ. जोशी
माजी आमदार फेसबुक वॉलवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button