सामाजिक

शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या चार दिवसांत दहा हजार प्रतींची विक्री

 

​मुंबई – राज्यामध्ये सध्या एका ऐतिहासिक पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून हा नवा वाद उफाळून आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर वाचकांची उत्सुकता इतकी वाढली आहे की , केवळ चार दिवसांत या पुस्तकाच्या तब्बल दहा हजार प्रतींची विक्री झाली आहे. सद्यस्थितीत बाजारातील सर्व प्रती संपल्यामुळे प्रकाशकांनी तातडीने या पुस्तकाची नव्याने छपाई सुरू केली आहे.

​कॉ. गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी आणि सर्वसमावेशक प्रतिमा अत्यंत मोजक्या शब्दांत या पुस्तकातून वाचकांसमोर मांडली आहे. ७२ पानांचे हे छोटेखानी पुस्तक सुरुवातीला लोकवाङ्मय या संस्थेने प्रकाशित केले होते. विशेष म्हणजे , त्यावेळी या पुस्तकाची किंमत अवघी पाच रुपये इतकी होती. महाराजांचा हा वेगळा दृष्टिकोन अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरला आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. मागील ३८ वर्षांत या पुस्तकाच्या तब्बल ११५ पेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून , आतापर्यंत वीस लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून याला प्रचंड मागणी असून , आजवर विविध २४ भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद करण्यात आला आहे.

​नुकतेच आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे नाव बदलण्याच्या कारणावरून साऊ प्रकाशनचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना त्यांच्या जीविताचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याच कारणामुळे पुस्तकाच्या नावावरून पुन्हा एकदा राज्यात मोठी चर्चा आणि वाद सुरू झाला. यातूनच वाचकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि राज्यभरातून प्रकाशकांकडे पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली.

​सध्या लोकवाङ्मय , श्रमिक प्रतिष्ठान , समाजवादी प्रबोधिनी आणि साऊ प्रकाशन या चार संस्थांच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित केले जात आहे. साऊ प्रकाशनच्या वतीने मूळ पुस्तक जसेच्या तसे प्रकाशित करण्यात येत आहे. मात्र , कॉ. गोविंद पानसरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर काही प्रकाशकांनी या पुस्तकात डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रस्तावना नव्याने समाविष्ट केली आहे. पुस्तकाच्या नावावरून यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत , मात्र खुद्द पानसरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर ते वाद शमले होते. सध्याच्या वाढत्या मागणीबाबत प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले की , राज्यभरातून दररोज एक हजार ते दोन हजार पुस्तकांच्या ऑर्डर्स येत आहेत. सर्व प्रती हातोहात संपल्यामुळे आता तातडीने पुस्तकाची पुढील छपाई सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button