अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात या, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर जैन समुदायात संताप

मुंबई –
जैन समाजाने अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, जैन धर्मीयांना अल्पसंख्याक हा शिक्का पुसून टाकण्याची वेळ आली, हा दर्जा काँग्रेसचे षड्यंत्र आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी केले. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला असून जैन समुदायात संतापाची लाट उसळली आहे. जैन समाजाच्या काही नेत्यांनी हा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत याला विरोध केला आहे. लोढांच्या या वक्तव्यावरुन जैन समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले होते कि जैन धर्मियांची पूजा पद्धती वेगळी असली तरी ते हिंदुच असून आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत हिंदू एकत्रित येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण साध्य होणार नाही. अल्पसंख्यांक राहून हे उदिष्ट साध्य होणार नाही.
एकेकाळी भारतावर मुघल आणि इतर मुस्लिम राजांनी आक्रमण केले. त्यांनी जैन धर्मीयांमध्ये फूट पाडली. ब्रिटिश राजवटीतही फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून अनेक गटांना अल्पसंख्यांक बनवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेस राजवटीतही जाती धर्मात तेढ निर्माण केले. जैनमध्ये विष पेरून काँग्रेसने अल्पसंख्यांक घटक अधिक बळकट केले. मात्र मुस्लिम समुदायात जाती असल्या तरी कधीही त्यांची विभागणी काँग्रेसने केली नाही.
दक्षिणेतही एकेकाळी 22 ते 23 टक्के जैन समुदाय होता. आता केवळ हा समाज तिकडे 3 टक्के इतकाच आहे. हे सर्व काँग्रेसच्या षढयंत्राचा भाग आहे. रामजन्मभूमी आंदोलनात अल्पसंख्यांक समुदायानेही भाग घेतला. पूजेची माध्यमं जरी वेगळी असली तरी आम्ही हिंदुच आहोत असे लोढा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर जैन समाजून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मंत्री लोढांवर जोरदार टीका केली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजातील कोणालाही विश्वासात न घेता हे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान अज्ञानमूलक आहे किंवा ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे, अशी टीका ललित गांधी यांनी केली आहे.
ललित गांधी पुढे म्हणाले कि जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वतःचे तीर्थंकर, स्वतःची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे, असे ललित गांधी यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांमध्ये आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये जैन धर्माची स्वतंत्रता, प्राचीनता सिद्ध झालेली आहे. त्यामुळे या विषयावर नव्याने वाद निर्माण करणे हे जैन समाजावर आघात ठरेल. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्यापूर्वीच विविध राज्यांमध्ये सुमारे 25 वर्षांपूर्वी जैन समाजाला हा दर्जा मिळालेला होता. अल्पसंख्याक दर्जा हा आमच्या संख्येचे प्रतिबिंब आहे. तो आमच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण, तीर्थक्षेत्रांचे रक्षण, शिक्षण घेण्याचे व संस्था चालवण्याच्या हक्कांचे संरक्षण करतो. तसेच आमच्या प्राचीन वारशाचे जतन करण्यासाठी हा एक प्रभावी माध्यम आहे, असे गांधी म्हणाले.
अल्पसंख्याक दर्जा हा एकप्रकारे आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्त्वालाच नाकारणे होय. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करु. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जैन समाज आता शांत बसणार नाही, हे लोढा यांनी समजून घ्यावे, अशा इशाराही ललित गांधी यांनी दिला.



