सोलापूर

सोलापूर येथे      ” गुरु स्मरण सोहळा  ” विविध कार्यक्रमाने संपन्न

सोलापूर ( प्रतिनिधी ) दर वर्षी प्रमाणे  या वर्षीचा , पं. भीमराव कनकधर  आणि पं.  विठ्ठलराव क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त  गुरु स्मरण सोहळा , रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता , लोकमान्य टिळक सभागृह ( ॲम्फीथिएटर )  सरस्वती चौक सोलापूर येथे अतिशय दिमाखात संपन्न झाला .
या वर्षी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते , सौ. संगीता अग्निहोत्री ,  ( इंदौर  ) यांचे स्वतंत्र तबलावादन आणि टीव्ही वरील प्रसिद्ध सा रे ग म ,  या  कार्यक्रमात मध्ये  ढोलकीची साथ करणारे  . कृष्णा मुसळे , ( मुंबई  ) यांचे स्वतंत्र ढोलकीवादन .
सौ. संगीता अग्निहोत्री (तबला कलाकार) मध्य प्रदेशातील पहिली महिला तबला कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत  .
संगीता अग्निहोत्री यांनी त्यांचे वडील पं. दिनकर मुजुमदार  यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण घेतले आहे ,  त्याचे वडील उस्ताद जहांगीर खान साहेब यांचे शिष्य आहेत .
तबल्यावरील पुरब बाज त्यांनी अतिशय वजनदार पणे आणि लिलया वाजविला. रियाजी वजनाने तबला वाजविणे हे त्यांचे वैशिष्ट्य . पेशकार , कायदा , बंदिशी , रेले  इत्यादीतून त्यांचा घरांदाज तबला ऐकताना सोलापूरच्या रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळाली . मिंड की गत वाजविताना  तर , उस्ताद गुदई महाराज उर्फ सामता प्रसाद यांची प्रकर्षाने आठवण झाली . त्यांना लेहऱ्याची उत्कृष्ठ साथ पुण्याच्या आदिती गराडे यांनी केली .
या वर्षीच्या गुरु स्मरण सोहळ्याचे मानकरी होते  टीव्ही वरील अतिशय गाजलेल्या सा रे ग म  या संगीत स्पर्धा कार्यक्रमाचे ढोलकीपटू कृष्णाजी मुसळे .  कृष्णा मुसळे यांनी आपले ढोलकीचे सुरुवातीचे शिक्षण वडिल व गुरू .पांडुरंग घोटकर यांच्याकडुन घेतले . पण त्यांच्या ढोलकीला वादनाची म्हणून एक शिस्त हवी म्हणून वडिलांनी त्यांना त्यांचे गुरुबंधू अरविंद मुळगांवकर यांच्याकडे तबला शिकायला पाठवलं . कृष्णा मुसळे यांनी सलग बारा वर्षं अरविंद मुळगांवकर यांच्याकडे तबलावादनाचं शिक्षण घेतलं . मात्र तबल्याचं रीतसर शिक्षण घेतल्यावरही त्यांना भूल पडली ती ढोलकीचीच  !  
कालच्या सोहळ्यात त्यांनी ढोलकीची परंपराच डोळ्यासमोर उभी केली . कृष्णा मुसळे यांनी ढोलकी सोबतच तबल्याचं शास्त्र शुद्ध शिक्षण पं. अरविंद मुळगावकर यांच्या कडे घेतलेलं असल्यामुळे त्यांच्या ढोलकी वादनाला एक वेगळाच फ्लेवर आहे . ढोलकीला स्वतंत्र तबल्याप्रमाणे भाषा नसते , ती ऐकून ऐकून शिकावी लागते . त्यामुळे बोली भाषेतील शब्दांचा आधार घेऊन ती शिकावी लागते , असे त्यांनी सांगितले . ” धा धा धातीना ”  हे वाजवताना , ते  ” घास घास घाशीराम  ” असे ऐकू येते . अशाच बोली भाषेत , वडील आणि गुरु पांडुरंग घोटकर यांनी आपल्याला ढोलकी शिकविली असा उल्लेख त्यांनी केला .
त्या त्या वादकांच्या नावाने वाजल्या जाणाऱ्या अनेक ठेक्यांची त्यांनी रसिकांना प्रत्यक्षिकं करून दाखविली आणि रसिकांना देखील ती खूपच भावली . जुन्या काळातील  ढोलकी वादक , विठ्ठलराव क्षीरसागर , पांडुरंग घोटकर , लाला गंगावणे , यासिन म्हाब्री , पंडित विधाते , अण्णा जोशी , अशा नामवंत कलावंताचं नाव आपण जपलं पाहिजे असं त्यांनी आवर्जून सांगितलं . दोन्ही कार्यक्रमाना  आदिती गराडे यांनी हार्मोनियम ची उत्तम साथ दिली . अनिल लोंढे यांनी ढोलकी सोबत गायनाची उत्तम साथ दिली . संदीप साऊंड यांनी ध्वनी व्यवस्था उत्तम पणे सांभाळली . कार्यक्रमाच्या सूत्र संचलनाची बाजू सतीश वैद्य यांनी सांभाळली . या कार्यक्रमासाठी दादांचे शिष्य परिवार आणि रवींद्र क्षीरसागर , शोभा कनकधर व्हटकर , डॉक्टर अनिल सर्जे  , प्रभाकर वाघचौरे , सुधीर कुलकर्णी, प्रशांत देशपांडे , देवदत्त जोशी , इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले . बऱ्याच दिवसांनी सोलापूरकरांना ही सांगितीक मेजवानी मिळाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button