देश - विदेश

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमाल निर्यात, वीजटंचाई व महागाईवर मौन – खासदार प्रणिती शिंदे

 

नवी दिल्ली -पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत व्यक्त केलेल्या भूमिकेवर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधानांचे वक्तव्य अत्यंत पोकळ आणि वरवरचे असून देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा थेट परिणाम देशातील शेतकरी आणि व्यापारावर होत आहे. टेरिफमुळे द्राक्षे, डाळिंब यांसारख्या फळांच्या निर्यातीला मोठा फटका बसला असून अनेक कंटेनर ‘स्टेट ऑफ हार्मोज’ परिसरात अडकून पडले आहेत. परिणामी व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत आणि शेतीमालाचे दर घसरत आहेत. मात्र या गंभीर विषयावर पंतप्रधानांनी कोणताही उल्लेख केला नाही.

यासोबतच, काँग्रेसने पश्चिम आशियातील परिस्थितीवर संसदेत सविस्तर चर्चेसाठी नोटीस दिली असतानाही ती अद्याप स्वीकारली गेलेली नाही. युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवणारी महागाई, गॅस टंचाई आणि आर्थिक परिणाम यावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत चर्चा करण्याची आमची सातत्याने मागणी आहे.

राज्यातील वीजटंचाईच्या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधानांनी वीजटंचाई होणार नसल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वीजटंचाई जाणवत आहे. सध्या शेतीला पाण्याची अत्यंत गरज असताना शेतकरी विजेसाठी हतबल झाले आहेत, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना देखील वीजपुरवठा सुरळीत नाही. ही वास्तवस्थिती सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही पंतप्रधानांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी केंद्र सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“सत्ताधारी पक्षाचा जमिनीवरील वास्तवाशी काहीही संबंध राहिलेला नाही. देशासमोरील गंभीर प्रश्नांवर सरकार मौन बाळगत असून, जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोप करत शिंदे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button