भगतसिंग: फासावर गेलेला एक प्रखर नास्तिक आणि तर्कनिष्ठ विचारवंत

२३ मार्च! हा दिवस भारतीय इतिहासात केवळ एका बलिदानाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर तो एका प्रगल्भ विचाराचा विजयोत्सव आहे. लाहोर तुरुंगात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन तरुणांनी हसत-हसत फाशीचा स्वीकार केला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी मृत्युला ज्या धैर्याने कवळले, ते पाहून आजही अंगावर शहारे येतात. पण दुर्दैवाने, काळाच्या ओघात आपण भगतसिंगांच्या प्रतिमेची पूजा करायला शिकलो, मात्र त्यांच्या मेंदूत धगधगणाऱ्या विचारांची मशाल समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो. भगतसिंग हे केवळ ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध पिस्तूल उगारणारे लढाऊ सैनिक नव्हते; ते एक महान विचारवंत, प्रकांड पंडित आणि अत्यंत ठाम ‘नास्तिक’ होते. त्यांचा नास्तिकवाद हा कोणत्याही वैयक्तिक आकसापोटी किंवा प्रसिद्धीसाठी आलेला नव्हता, तर तो त्यांच्या सखोल वाचनाचा, चिंतनाचा आणि तर्कशुद्ध मांडणीचा परिपाक होता.
भगतसिंगांचा जन्म एका शीख कुटुंबात झाला होता. त्यांचे आजोबा अर्जुन सिंग हे आर्य समाजाचे अनुयायी होते, जे मूर्तिपूजा नाकारत असले तरी ईश्वरावर विश्वास ठेवणारे होते. सुरुवातीच्या काळात भगतसिंग स्वतःही धार्मिक होते. ते शीख धर्माचे पालन करत, लांब केस राखत आणि ईश्वराची प्रार्थनाही करत असत. पण जसा त्यांचा जगाचा अभ्यास वाढला, तसतसे त्यांचे विचार बदलू लागले. त्यांनी रशियन राज्यक्रांती, मार्क्सवाद, समाजवाद आणि जागतिक इतिहासाचे हजारो पाने वाचून काढली. या वाचनातून त्यांना उमजले की, मानवाचे शोषण करणारी व्यवस्था ही केवळ राजकीय नसते, तर ती मानसिक आणि धार्मिक सुद्धा असते. तुरुंगात असताना त्यांच्यावर असा आरोप झाला की, ते आपल्या ‘अहंकारापोटी’ देवाला मानत नाहीत. या आरोपाला उत्तर देण्यासाठी त्यांनी “‘मी नास्तिक का आहे?’ (Why I am an Atheist?)” हा सुप्रसिद्ध लेख लिहिला, जो आजही प्रत्येक विवेकवादी माणसासाठी मार्गदर्शक ठरतो.
त्यांनी या लेखात अत्यंत तार्किक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणतात, “जर ईश्वर सर्वशक्तिमान, दयाळू आणि न्यायप्रिय आहे, तर त्याने हे जग दुःख, भूक, गरीबी आणि विषमतेने का भरले आहे? ईश्वराने हे जग का निर्माण केले? जर तो दयाळू आहे, तर मग निष्पाप लोकांवर होणारे अत्याचार तो का पाहत बसतो? जर तो हे सर्व थांबवू शकत असेल आणि तरीही थांबवत नसेल, तर मग तो दयाळू नाही; आणि जर तो हे थांबू शकत नसेल, तर मग तो सर्वशक्तिमान नाही.” भगतसिंगांच्या मते, ‘ईश्वर’ ही संकल्पना मानवाने आपल्या भीतीपोटी आणि अज्ञानापोटी निर्माण केली आहे. जेव्हा माणसाला नैसर्गिक संकटांचे कारण समजले नाही, तेव्हा त्याने त्या शक्तींना ‘देव’ मानले आणि जेव्हा त्याला शोषणाचे कारण समजले नाही, तेव्हा त्याने त्याला ‘नशिबाचा खेळ’ मानून स्वतःला समजावले. धर्माचा वापर हा सत्ताधारी वर्ग सामान्य जनतेला शोषित ठेवण्यासाठी करतो, जेणेकरून ते या जन्मातील अन्यायाविरुद्ध आवाज न उठवता परलोकातील सुखाच्या आशेवर शांत बसतील.
भगतसिंगांसाठी नास्तिकता म्हणजे केवळ देव नाकारणे नव्हते, तर ती चिकित्सक वृत्ती (Critical Thinking) आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार होता. त्यांनी तरुणांना साद घातली की, “ज्याला प्रगतीची इच्छा आहे, त्याने प्रचलित विश्वासाच्या प्रत्येक बाबीवर टीका केली पाहिजे, त्यावर शंका घेतली पाहिजे आणि त्याला आव्हान दिले पाहिजे.” हीच चिकित्सक वृत्ती क्रांतीचे पहिले पाऊल असते. फाशीच्या आदल्या रात्री जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना ईश्वराचे नाव घेण्याची आणि माफी मागण्याची विनंती केली, तेव्हा भगतसिंग हसून म्हणाले, “मी आयुष्यभर देवाला मानले नाही. आता मृत्यू समोर पाहून जर मी त्याचे नाव घेतले, तर मी ढोंगी ठरेन. लोक म्हणतील की भगतसिंग घाबरला. मला मृत्यूची भीती नाही, कारण मी माझ्या तत्त्वांसाठी मरणार आहे.”
आजच्या काळात, जेव्हा समाजात धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत आणि विज्ञानापेक्षा अंधश्रद्धेला महत्त्व दिले जात आहे, तेव्हा भगतसिंगांचे विचार अधिक प्रासंगिक ठरतात. त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा आणि समतेचा विचार केला. भगतसिंगांना खरी श्रद्धांजली म्हणजे केवळ त्यांचे फोटो भिंतीवर लावणे नव्हे, तर त्यांच्यासारखा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे, अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारणे आणि तर्कनिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही आहे. शहीद दिनानिमित्त आपण हाच संकल्प करूया की, आपण आपल्या बुद्धीचा वापर करू, सत्याचा शोध घेऊ आणि माणुसकीलाच आपला सर्वोच्च धर्म मानू.
फेसबुक वॉलवरून



