क्राईम

अक्कलकोटातील लाचखोर पोलीसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली !

 

समाज माध्यमांवर टीकेची झोड !
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका प्रकरणात स्कार्पिओ वाहन व मोबाईल परत देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख वीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी मोठी कारवाई केली होती. एसीबीच्या कारवाईनंतर दोन लाचखोर पोलिसांमुळे उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली आहे. समाज माध्यमांवर पोलिसांच्या एकूणच मनमानी भ्रष्ट कारभाराबद्दल टीकेचे झोड उठवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच लाचखोर पोलिसांच्या आर्थिक व्यवहारांची त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील जनतेमधून करण्यात येत आहे.
 दिनांक १५ जून रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या वतीने काम करणारा एका खाजगी व्यक्तीस सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर  रामचंद्र कोळी व पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि खासगी व्यक्ती आकाश शरणप्पा काडरामे यांचा समावेश होता. तक्रारदाराची स्कार्पिओ गाडी त्यांच्या मित्राने फिरण्यासाठी घेतली होती. संबंधित वाहनाचा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून तक्रारदाराच्या लहान भावाचा मोबाईल आणि स्कार्पिओ वाहन ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांच्या वडिलांचे आणि काकांचे नाव गुन्हा टाकून अटक करण्याची भीती पोलिसांकडून दाखवण्यात आली होती. तसेच वाहन आणि मोबाईल परत मिळवून देण्यासाठी व नातेवाईकांना मदत करणाऱ्या करण्याच्या बदल्यात सुरुवातीला एक लाख चाळीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली नंतर तडजोडीनंतर एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले. दिनांक १५ जून रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर आरोपी आकाश काडरामे याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम पंचा समक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले .या प्रकरणी पोलीस कर्मचारी राजशेखर कोळी व लक्ष्मीकांत देडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीच्या कारवाईने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे .पोलिसांच्या या लाचखोर प्रकरणामुळे उत्तर पोलीस ठाण्याची प्रतिमा डागाळली असून समाज माध्यमांवर पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल टीकेची जोड उठली आहे. लाचखोरीत सापडलेले दोन पोलीस कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चर्चा ही सोशल मीडियावर रंगली आहे .प्रत्येक कामात पैसा कमावणे हेच उद्देश या भ्रष्ट पोलीस कर्मचारी ठेवल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे .तसेच या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोट्यावधींची माया कमावल्याचे बोलले जात आहे. लाचखोरीत सापडलेले पोलीस कर्मचारी राजशेखर कोळी आणि लक्ष्मीकांत देडे यांच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी होणे अपेक्षित आहे. तरच पोलीस खात्यावरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास राहणार आहे. अक्कलकोट तालुका हा सीमावर्ती तालुका असून या तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात जुगार अड्डे ,अवैध दारू विक्री , गुटखा विक्रीसह विविध अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या अवैध धंद्यांवर एकदाही कारवाई केल्याची घटना घडली नाही. यामुळे पोलीस खात्याच्या एकूणच कारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. अनेक पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांमध्ये सहभागी असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक पोलीस कर्मचारी अक्कलकोट तालुका सोडून जाण्यास तयार नसतात. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील सेवाकाळ पूर्ण झाल्यावर दक्षिण पोलीस ठाण्यात बदलीवर जोर दिला जातो. यानंतर वळसंग पोलीस ठाण्यात बदली करून घेण्यात येते अशी चर्चा जनतेत सुरू आहे. पोलिसांना कायद्याचे रक्षक म्हणून पाहिले जाते पण काही पोलीस कर्मचारी हे रक्षकापेक्षा भक्षक म्हणून काम करत असल्याने या खात्याची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे व उत्तर पोलीस ठाण्यातील बदली झालेल्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांची विनंती बदलीची चौकशी करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. अक्कलकोट सारख्या सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून ग्रामीण पोलीस अधीक्षक सोलापूर याकडे लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवर पोलीस खात्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे .जनभावनेची कदर पोलीस प्रशासन करणार का ? हा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button